लता भिसे सोनावणे
२०१५ मध्ये सोलापूरला ‘कॉम्रेड मीनाक्षीताई साने नगर’ या नावाने बिडी कामगारांची घरकुलं तयार होऊन त्यांचं उद्घाटन झालं. बिडी कामगारांच्या हक्कामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. बिडी कामगारांना स्वत:चं घर मिळवून देऊन त्यांच्या हक्कांचा पाया घालणाऱ्या कॉम्रेड मीनाक्षीताई साने यांचं त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मीनाक्षीताईंचा जन्म १८ मे १९०९ रोजी एका सुविद्या घरात झाला. त्यांचे काका होते रियासतकार सरदेसाई आणि आजोबा होते डॉ. वा. का. किर्लोस्कर. लहान वयात आईचा मृत्यू झाल्याने त्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमात राहून शिक्षण घेतलं. तेथे असलेल्या अनेक स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांची सेवाभावी वृत्ती याचा मीनाक्षीताईंच्या जीवनावर खूप परिणाम झाला. त्यांचे भाऊ श्रीनिवास सरदेसाई यांच्यामुळे मार्क्सवादी विचार त्यांनी स्वीकारले. कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्व घेतलं. भावामुळे त्यांची कॉ. कऱ्हाडकर यांच्याशी ओळख झाली आणि दोघे विवाहबद्ध होऊन सोलापुरात कार्य करू लागले. बिडी कामगार स्त्रिया, गिरणी कामगार आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्त्री हक्काच्या लढाया यामध्ये त्या निरंतर कार्यरत होत्या.

१९०९मध्ये जन्मलेल्या मीनाक्षीताईंनी वयाच्या २१व्या वर्षी म्हणजे १९३० मध्ये ‘सविनय कायदेभंगाच्या चळवळी’त सहभाग घेतला. या काळात ब्रिटिश सरकारने जनतेवर लादलेल्या वन कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या जंगल कायद्यानुसार, जंगलात गुरांना चरण्यासाठी पैसे भरावे लागत होते तर जे राखीव वनक्षेत्र होते, तेथील गवताचा लिलाव होत होता. यामुळे १९३० मध्ये महाराष्ट्राच्या नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, रायगड अशा अनेक ठिकाणी शेतकरी आणि आदिवासींनी ‘कायदेभंगाच्या चळवळी’ला सुरुवात केली. देशभर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात अशा ‘कायदेभंगाच्या चळवळी’ सुरू होत्या. ब्रिटिशांविरोधामध्ये शेतकऱ्यांच्या या व्यापक चळवळीत रायगड जिल्ह्यातील चिरनेरमध्ये नागू कातकरी शहीद झाले, तर नाशिक जिल्ह्यात लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अटक झाली होती. अशा या व्यापक आंदोलनात मीनाक्षीताईंनी सहभाग घेतला आणि त्यांना त्यावेळी अटक झाली.

कॉम्रेड मीनाक्षीताई साने आणि सोलापूरची कामगार चळवळ असं समीकरणच होतं. मोठ्या प्रमाणावर महसूल मिळावा त्यामुळे ब्रिटिशांनी अनेक उद्याोगांना मदत केली. महाराष्ट्रामध्ये खासगी साखर कारखाने याच्याबरोबरच बिडी उद्याोग, तंबाखू उद्याोग यालाही ब्रिटिशांनी मदत केली. सोलापूरमध्ये आंध्र-कर्नाटकातून आलेले विणकाम कामगार, हातमाग चालवणारे कामगार मोठ्या प्रमाणावर होते आणि हातमाग उद्याोगही मोठ्या प्रमाणावर होता. या कामगारांच्या घरामधील स्त्रियांकडे बिड्या वळण्याचं पारंपरिक कौशल्य होतं. त्यामुळे सोलापूरमध्ये बिडी उद्याोग वाढला. सोलापूर-संगमनेर येथे कामगार या स्त्रियाच होत्या. विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पुरुषांचं प्रमाण जास्त होतं. घरबसल्या काम देण्यामध्ये मालक वर्गाचाही खूप फायदा असतो, कारण मोठ्या प्रमाणावर बिड्या करून घ्यायच्या तर मग कामगारांना कामाच्या ठिकाणी बोलवून मोठी भांडवल गुंतवणूकही करावी लागते आणि त्यामुळे बिडी उद्याोग घरातूनच सुरू झाला. परंतु त्यामुळे त्यावेळी बिडी कामगारांचं आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर शोषण होत होतं. अन्य कामगार वर्गाप्रमाणे बिडी कामगारांना हक्क नव्हते. १९३० च्या कायदेभंग चळवळीतील संगमनेर

भारतातील बिडी कामगार कायद्यांचा पाया हा १९२०मध्ये स्थापन झालेल्या ‘आयटक’ने (अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस) घातला. आणि जे लढे ‘आयटक’मार्फत लढले गेले. त्यामध्ये मीनाक्षीताईंच्या नेतृत्वातील लढ्यांनी योगदान दिलं होतं. बिडी कामगारांच्या हक्काचे जे काही कायदे आहेत त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे मालकीचं घर मिळण्याचा त्यांचा अधिकार. त्यामध्ये सरकारचं योगदान मिळावं यासाठी मीनाक्षीताईंनी लढा दिला, हे विसरता येणार नाही. ‘मालकीचं घर’ हे कष्टकरी वर्गाचं स्वप्न त्यावेळी त्यांच्यामुळे पूर्ण झालं. केवळ बिडी कामगारच नाही, तर सोलापुरातील अन्य कष्टकरी समूहांचे प्रश्नही मीनाक्षीताईंनी लावून धरले.

यामध्ये आणखी एक महत्त्वाचं काम भटक्या विमुक्तांविषयी. भटक्या विमुक्तांना गुन्हेगार ठरवून त्यांना तारेच्या कंपाऊंडच्या आत गुलामासारखं ठेवलं गेलं होतं. त्याला ‘सेटलमेंट’ म्हणत, तशी मोठी ‘सेटलमेंट’ सोलापुरातही होती. ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या समूहांना ब्रिटिशांनी गुन्हेगार जमात ठरवलं आणि त्यांच्यावर अनेक बंधनं आली. ते कुठे जातात? केव्हा परत येतात? या सर्वांच्या नोंदी केल्या जात असत. हा एक गुलामीचा प्रकार होता. सोलापूरमधील ‘सेटलमेंट’च्या तारा काढून त्यांना मुक्त करावं ही मागणी मीनाक्षीताई यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाने १९३७ मध्ये केली. हे मीनाक्षीताईंचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूरला आले आणि त्यांनी ‘सेटलमेंट’च्या तारा कापल्या. भटक्या विमुक्तांना त्या तारांमधून मुक्त केलं.

सतत तुरुंगवास

कामगार आंदोलनात मीनाक्षीताई सहभागी होत्या. तेव्हाही त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि सक्त मजुरीची शिक्षा झाली. १९४० मध्ये युद्धविरोधी चळवळीमध्ये त्या सहभागी झाल्या. म्हणून त्यांना अडीच वर्षं स्थानबद्ध केलं गेलं होतं, तर १९४७ मध्ये सोलापूरच्या गिरणी कामगार संपात पुन्हा अडीच वर्षं स्थानबद्ध केलं गेलं होतं. १९३० ते १९४७ या १७ वर्षांत त्या साडेपाच वर्षं तुरुंगात होत्या आणि तेही सक्तमजुरी करत. ४ जून १९५४ ला ‘भारतीय महिला फेडरेशन’ची स्थापना कलकत्त्यामध्ये(आता कोलकाता) झाली. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये त्यावेळी ‘श्रमिक महिला समिती’ या नावाने अनेक स्त्रिया कार्य करीत होत्या. त्यामध्ये माई बागल, प्रभावती सूर्यवंशी, तारा रेड्डी, मंजू गांधी, कुसुम नाडकर्णी, करुणा चौधरी अशा अनेकजणी होत्या. ‘महिला फेडरेशन’ या नावाने महाराष्ट्रात त्याची स्थापना झाली आणि त्याच्या पहिल्या अध्यक्ष मीनाक्षीताई साने होत्या.

सोलापूर सोडून मीनाक्षीताई मुंबईत आल्या होत्या आणि मुंबईतूनच त्यांनी ‘महिला फेडरेशन’ची बांधणी पूर्ण महाराष्ट्रभर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडलं. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता, परंतु ‘भारतीय महिला फेडरेशन’, ‘समाजवादी महिला’ माई आंबेडकर यांच्या नेतृत्वातील ‘रिपब्लिकन पक्षा’च्या महिला कार्यकर्त्या यांनी ‘हिंदू कोड बिल’ आलंच पाहिजे यासाठी महाराष्ट्रात मोठी आंदोलनं केली. मीनाक्षीताईंचाही त्यामध्ये मोठा सहभाग आणि मार्गदर्शनही होतं.

महागाई प्रतिकार समितीची स्थापना

१९७२मध्ये एका बाजूला प्रचंड दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला वाढलेली महागाई या परिस्थितीत महाराष्ट्रातील जनता पोळून निघत होती. रेशनवर मिळणारं धान्य अपुरं आणि अत्यंत निकृष्ट होतं. रेशनला मोठ्या रांगा लागत आणि, स्त्रियांना घर चालवताना रेशनचा प्रश्न खूप सतावत होता. मीनाक्षीताईंनी ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या नेत्या म्हणून ‘महागाई प्रतिकार समिती’ तयार व्हावी म्हणून मुंबईतील अनेक संघटनांना एकत्र बोलवलं. पहिली बैठक मीनाक्षीताईंनी बोलावलेली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यातूनच मुंबईमध्ये सुप्रसिद्ध ‘लाटणे मोर्चा’ काढणारी आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयात जाऊन रेशनच्या प्रश्नावर आवाज उठवणारी ‘महागाई प्रतिकार समिती’ तयार झाली. ‘प्रतिकार समिती’च्या आंदोलनामुळे रेशन व्यवस्था, रेशनवरील धान्य यामध्ये सुधारणा झाली आणि पुढे ‘अन्नसुरक्षा कायदा’ही आला.

सोलापुरात त्यांनी ‘एकजूट’ हे पाक्षिक सुरू केलं होतं. ‘भारतीय महिला फेडरेशन’तर्फे स्त्रियांमध्ये जागृती आणि प्रबोधन करण्यासाठी ‘महिला आंदोलन पत्रिका’ या मासिकाची स्थापना करण्यात मीनाक्षीताईंचा पुढाकार होता. त्या लेखिकाही होत्या. पक्षाचे नियतकालिक ‘युगांतर’ त्याचप्रमाणे ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ या त्या काळातील नामवंत मासिकांमध्ये त्या लिखाण करत होत्या. केवळ भारताचाच नाही तर जागतिक परिस्थिती आणि कामगार वर्ग याचाही त्यांचा अत्यंत चांगला अभ्यास होता.

हे कार्य करत असतानाच त्यांनी शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण कार्य केलं. सोलापूर नगरपालिकेमध्ये त्यांची नेमणूक झाली आणि तेथे त्यांनी शिक्षणविषयक अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं, कारण सोलापुरात कामगार वर्गाच्या मुलांच्या शिक्षणाचा खूप गंभीर प्रश्न होता आणि त्याबाबत धोरणात्मक निर्णय असणं आवश्यक होतं. बिडी कामगार, गिरणी कामगार यांच्यासोबतच मीनाक्षीताईंनी सोलापुरातील अन्य स्त्रियांमध्येही जागृती केली. सोलापुरात जेव्हा पत्रकारांची परिषद झाली होती तेव्हा त्या परिषदेचं सर्व व्यवस्थापन या स्त्रियांनी केलं होतं. सोलापुरातील स्त्रिया पहिल्यांदा अशा कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या.

मीनाक्षीताईंच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना परदेशी बोलावलं गेलं. स्वीत्झर्लंडमध्ये त्यांनी ‘माता-बालक कार्यक्रमा’बाबत आपली भूमिका मांडून जगातील स्त्री चळवळीला मार्गदर्शन केलं. मीनाक्षीताईंविषयक एक मुद्दा खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. मीनाक्षीताईंचा वैचारिक मतभेदांमुळे घटस्फोट झाला. त्यांनी नंतर कॉ. साने यांच्याशी विवाह केला. त्याआधीही मीनाक्षीताई कुंकू लावीत नसत, त्यांचे केसही कापलेले होते. त्या काळामध्ये घटस्फोट झालेली, पुनर्विवाह केलेली, कुंकू न लावणारी राजकीय कार्यकर्ती यावर निश्चितपणे समाजात चर्चा होत असे. पण ज्या समाजामध्ये मीनाक्षीताई काम करत होत्या, त्या समाजामध्ये त्यांच्या कार्याची चर्चा होई आणि त्यांचं कार्य इतकं महत्त्वाचं होतं की, त्यांचं कुंकू न लावणं, त्यांचा घटस्फोट हा कामगार वर्गाला कधीही चर्चेचा, टीकेचा विषय वाटला नाही. त्यांचा मुलगा जतिंद्र कऱ्हाडकर हाही पक्षात सक्रिय होता. मीनाक्षीताईंचं एक हृद्या चरित्र त्यांची भावजय शांताबाई किर्लोस्कर यांनी ‘कॉ. मीनाक्षी साने -एक भुईचक्र’ या नावानं लिहिलं.

मीनाक्षीताई तळेगावला नातेवाईकांच्या ‘सरदेसाई रुग्णालया’मध्ये राहात असत. मी त्यांना तेथे भेटायला जात असे. अगदी नम्रपणे, शांतपणे त्या अनेक आठवणी सांगत. ब्रिटिशांच्या काळात तुरुंगवास सहन करणं सोपं नव्हतं. ब्रिटिश त्यांना अटक करत होते, कारण त्या जनतेसाठी लढणाऱ्या होत्या. त्यांना अटक करून आंदोलकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं ब्रिटिशांनी ठरवलं होतं. त्या तुरुंगात असल्या, तरी बाहेर आंदोलनं चालू असत आणि त्यातूनच बिडी कामगारांचे अनेक हक्क कायद्याच्या रूपात बिडी कामगारांना मिळाले. १७ ऑगस्ट १९८९ला त्यांचं निधन झालं.

महाराष्ट्राच्या कामगार वर्गाचा, स्त्री कामगार हक्काच्या लढ्याचा इतिहास कॉम्रेड मीनाक्षी साने यांच्याशिवाय अपुरा राहील. एवढं कार्य त्यांनी केलं आहे. मात्र मीनाक्षीताईंनी जे ‘कामगार कायदे’ घडवले, आज तेच हक्क पायदळी तुडवले जात आहेत. आपलं संपूर्ण जीवन कामगार वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि नवा समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी मीनाक्षीताई आयुष्यभर लढल्या. ते हक्क टिकवून धरण्यासाठी ही लढाई चालू ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.

lata_fem@yahoo.com