लीलावती नारळीकर

जयंत नारळीकर यांच्यावर तुझे वडील म्हणून लेख लिहिशील का, असं विचारलं गेलं तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया जरा नकारात्मक होती. कारण असं वेगळं काय बरं लिहिता येईल? मी माझ्या बाबाचा असामान्य वडील म्हणून कधी विचार केला नाही. मी लहान असल्यापासून एक वैज्ञानिक म्हणून तो निश्चित प्रसिद्ध आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्याबरोबर बाहेर जायचो, तेव्हा आम्हालासुद्धा मस्त ट्रीटमेंट मिळायची! अजूनही मिळते. मात्र घरी आम्हाला कधीच ते जाणवलं नाही.

बऱ्याच गोष्टी तशा सामान्यच होत्या, परंतु काहींना जरा ‘अ‍ॅडिशनल अँगल’ होता, याची जाणीव मला स्वत:च्या मुली झाल्यावर झाली. उदाहरणार्थ, रात्री ‘बेडटाइम स्टोरी’ सांगणं हे सामान्य झालं, पण ती आयत्या वेळी, मुली सांगतील त्या पात्रांच्या आधारे नवीन गोष्ट बनवून सांगणं हे जरा वेगळं झालं. प्रत्येक वेळी नवी गोष्ट, पण तितकीच रोमांचक बनवायची, हे किती अवघड आहे हे आता लक्षात येतं.

बाबाबद्दलची माझी सगळ्यात जुनी आठवण आहे, ती मुंबईत शाळेतून दुपारी घरी चालत येण्याची आहे. तो दहा मिनिटांचा प्रवास, कोडी आणि सोपं बीजगणित यामुळे मजेशीर जायचा. तो प्रवास सुंदर असायचा.. होता.. आणि आजही तो चालूच आहे.. कारण कोडय़ांची प्रथा अजूनही आमच्या परिवारात टिकून आहे. आता त्यात आई-बाबांच्या तीनही जावयांचा आणि नातवंडांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे ही कोडी सोडवताना सगळे एकसमान असतो. कोणालाही उत्तर आधी सुचू शकतं आणि कोणाचंही उत्तर जास्त ‘एलिगंट’ असू शकतं. गणित आणि विज्ञानाची ही जणू खासियतच आहे. मला वाटतं विविध विषयातील संशोधनाची ओढ आम्हाला या कोडय़ांमुळे लागली असावी. मुलांना सायकल चालवायला शिकवणं हे काम बरेच वडील करतात. पण बाबाने मला त्याबरोबर काही वेगळे खेळसुद्धा शिकवले. ‘क्रोके’ हा एक ब्रिटिश खेळ मी त्याच्याकडून शिकले. रंगीत चेंडू आणि त्यांना फटके मारायला खास लाकडी दांडे यांनी तो लॉनवर खेळतात. ‘आयुका’तील (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) आमच्या घराच्या मागे तसं लॉन मुद्दाम करून ठेवलं होतं. खेळातली स्ट्रॅटेजी आणि नेमबाजी हे त्या खेळात महत्त्वाचे घटक ठरतात. अर्थात, बाबाला हरवणं सोपं नव्हतं.

एकदा एका सामान्य वडिलांसारखं, मी भरपूर दिवस हट्ट केल्यानंतर बाबा मला स्कूटी घ्यायला तयार झाला. आई, बाबा आणि मी दुकानात गेलो. स्कूटीसाठी खूप मोठी प्रतीक्षा यादी आहे, ती मिळायला ३-४ आठवडे लागतील, हे समजल्यावर मी खट्टू झाले. दुकानाबाहेर ८-१० स्कूटी दिमाखात उभ्या होत्या. त्या राखून ठेवल्या होत्या असं समजलं. विक्रेता म्हणाला, की त्या वेळी पितृपक्ष चालू होता, म्हणून कोणी नवीन स्कूटी नेत नव्हतं. बाबाने विचारलं, ‘आम्ही आता पैसे देऊन नेऊ शकतो का?’ दुकानदार  आनंदानं तयार झाला आणि मला त्याच दिवशी स्कूटी मिळाली! त्या वेळी दिवसांमध्ये शुभ-अशुभ मानतात, याची मला पहिल्यांदा जाणीव झाली होती. आमचे आजोबा तर म्हणत, की ‘दिवस शुभ किंवा अशुभ नसतात. आपण आपल्या कृत्यांनी तो शुभ किंवा अशुभ बनवतो.’ ‘शुभस्य शीघ्रम् अशुभस्य कालहरणं’ हे त्यांचं आवडतं वाक्य.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरात वैज्ञानिक दृष्टिकोन, कोडी सोडवणं, कोटय़ा करणं, हे आजोबांपासून चालत आलं आहे. पण काही प्रथा काळ आणि पिढीनुसार बदलल्या आहेत. आजोबांनादेखील टक्कल होतं. पण त्यांच्या ‘हेअरस्टाइल’बद्दल बोलायची कोणालाही हिंमत होत नसे. बाबाच्या केसांवर विनोद करणं हा मात्र आम्हा तिघी मुलींचा हक्क आहे.. इट नेव्हर गेट्स ओल्ड!