पुरवणी आवडली
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रसिद्ध झालेले (२६ फेब्रुवारी) ‘मराठी भाषेतील सरमिसळ’ आणि अनुवादकांसंदर्भातील लेख आवडले. ‘मराठी भाषेतली सरमिसळ’ या लेखामधील मराठीत रुळलेल्या इतर भाषिक शब्दांची उदाहरणे पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. असे वाटतही नाही की हे शब्द इतर भाषांमधून आले आहेत. हा लेख वाचताना एक प्रश्न पडला, की मराठी भाषेतून इतर भाषांमध्ये काही शब्द रुळले की नाही, या प्रश्नाचे उत्तरही कधीतरी ‘चतुरंग’मध्ये मिळेल अशी आशा वाटते. अनुवादकांबद्दल सांगायचे, तर इतर भाषिक पुस्तके मराठीत आणून ही मंडळी अतिशय मोलाचे काम करीत आहेत. जे साहित्य, संस्कृती वा व्यक्तिमत्त्वे कदाचित वाचकांना इतर भाषांच्या अज्ञानाअभावी आयुष्यभर अज्ञात, अनोळखी राहिली असती त्यांची छान, नेमकी ओळख या अनुवादकांमुळे होते. या लेखांतील चित्रकार नीलेश जाधव यांची रेखाचित्रेही अगदी समर्पक.
– मंगेश शशिकला पांडुरंग निमकर, कळवा
‘स्मृतिचित्रे’ विसरले जाणार नाही
‘वाचायलाच हवीत’ या सदरातील ‘मोठी तिची सावली’ या वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या लेखात (१९ फेब्रुवारी) रेव्हरंड टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या सहजीवनाचा प्रवास चित्रित करणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेल्या ‘स्मृतिचित्रे’ या पुस्तकावर योग्य प्रकारे भाष्य केले आहे. या पुस्तकात साध्यासोप्या शब्दांत त्या काळचे चित्रण तर आहेच, पण एकंदर सामाजिक स्थितीचा आढावाही आहे. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन या जोडप्याने सामाजिक कार्य केले. त्यांचे अनुभव वाचताना त्यांची परिस्थितीवर मात करण्याची प्रचंड जिद्द दिसते. निराशा, हताशा हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते. ‘स्मृतिचित्रे’ कधीही विसरले जाणार नाही.
– प्र. मु. काळे, नाशिक
‘प पोलीसचा’ आवडला
मृदुला भाटकर यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या सदरातील ‘प पोलीसचा’ हा लेख खूप आवडला. पोलिसांविषयी तसे खूप कमी लिहिले जाते आणि त्यात चांगले लिहिले जात नाही. पण मृदुला भाटकर यांनी त्यांना पोलिसांविषयी आलेल्या अनुभवांविषयी खूप छान लिहिले आहे. मीही एक पोलीसच आहे आणि ‘लोकसत्ता’चा जुना वाचक आहे. पोलिसांविषयी दखल घेणारा लेख पाहून आनंद झाला.
– राजेश्वर आइतवार, परभणी</p>