प्रतिसाद : अनुभवाचे बोल व आधुनिक संशोधनाची सांगड गरजेची

‘खाऊ या ‘त्यांच्या’साठीही’ हा मंजिरी घरत यांचा लेख (२४ फेब्रुवारी) फार छान आहे. पचनसंस्था ही दुसऱ्या मेंदूचे काम करत असते यावर बरेच संशोधन होत आहे. आतड्यांतील मित्रजंतूंसाठी आहार हेच औषध कसे असू शकते, हे सामान्य माणसाला समजण्यासारखे असून ते बऱ्याच आजारांच्या बाबत आशादायी ठरू शकते. जुने अनुभवाचे बोल आणि आधुनिक संशोधन याची सांगड घालणे सर्वांना उत्तम आरोग्य देण्यास नक्की उपयुक्त ठरेल. – डॉ. राजश्री कुलकर्णी

तरुणांच्या डोळ्यांत अंजन घालणारा लेख

जिभेच्या चोचल्यांना प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व, पिझ्झा, बर्गर, पास्ता, श्वारमा वगैरे पाश्चात्त्य अन्नाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि सुग्रास, ताज्या खाद्यापदार्थांच्या महतीची अनभिज्ञता असल्याने नाके मुरडणारा मध्यमवयीन वर्ग, असे आजचे चित्र आहे. अशा स्थितीत मंजिरी घरत यांचा ‘खाऊ या ‘त्यांच्या’साठीही’ हा लेख डोळ्यांत अंजन घालणारा आहे. या लेखाचे खरेतर प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाहीर वाचन व्हायला हवे. अत्यंत सोप्या, साध्या शब्दांत आपल्या पारंपरिक आहाराचे महत्त्व समजावून सांगितल्याबद्दल व पाश्चिमात्य अन्नाचे दोष शास्त्रीय पद्धतीने मांडल्याबद्दल लेखिकेचे कौतुक. – दिवाकर ठोंबरे

हेही वाचा…इतिश्री: चुकलं तर चुकलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मार्टफोन सजगतेनेच वापरावा.

‘नो स्मार्टफोन, प्लीज!’ हा गायत्री लेले यांचा लेख (२ मार्च) वाचला. हा संवेदनशील विषय हाताळल्याबद्दल आभार! स्मार्टफोनची भयानकता आपल्या हातातच दबा धरून बसलेली आहे, हे प्रकर्षाने जाणवले. समाजमाध्यमांची आमिषे खेळकर रूप दाखवून विशेषत: तरुणांना आपल्या व्यसनात अडकवतात याचे विदारक सत्य त्यांनी मांडले आहे. लेखिकेने दिलेली उदाहरणे जागरूक घरांतील आणि विकसित देशांतील आहेत. त्यावरून आपणांस अशा समस्यांना तोंड देणे किती जिकिरीचे ठरू शकते याची कल्पनाच केलेली बरी. आपली तरुण मुले गमावल्यानंतरही या स्त्रिया ही समस्या साऱ्या विश्वाची म्हणून ज्या तडफेने बलाढ्य कंपन्यांशी झुंजताहेत हे पाहून या विषयाचे गांभीर्य वेळीच ओळखायला हवे. स्मार्टफोनचा वापर सजकतेने, समर्थपणे करण्याची खूणगाठ बांधायला हवी. – विजय भोसले