‘कुत्र्यामांजरांच्या रूपातल्या सग्यासोयऱ्यांनी मला खूप काही शिकवलं. त्यांच्या भावना मी जाणून घ्यायला शिकलो. माणूस म्हणून जगू लागलो! भटक्या कुत्र्यामांजरांचा त्रास वाटणं साहजिक आहे, पण त्यांची हलाखीची अवस्था माणसांच्या आक्रमणामुळेच झालेली नाही का? एका जरी प्राण्याला तुम्ही जीव लावलात तरी ती तुम्हाला जीव लावतात आणि आपण माणुसकीचा, भूतदयेचा नवा अध्याय शिकलो, हे उमगतं..’ सांगताहेत प्राणीप्रेमी प्रणव लेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाळीव प्राणी हे आपले सगेसोयरे असतात यात कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. कुठलाही प्राणी लहानपणापासून प्रेमळ माणसांबरोबर वाढला असेल, तर तो आपसूक माणसाळतो. डार्विननं त्याच्या उत्क्रांती शोधनिबंधात लिहिल्याप्रमाणे प्रत्येक सजीवाच्या उत्क्रांतीला आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असते. अगदी हीच गोष्ट मी माझ्या या सग्यासोयरांबरोबर अनुभवली.

मी मांजर आणि कुत्र्यांच्या तेव्हा संपर्कात आलो, जेव्हा मी जर्मन शेफर्ड कुत्रा पाळायचं ठरवलं. खरंतर मी कुत्र्यांना प्रचंड घाबरायचो, कारण त्यांच्याविषयी असलेलं अज्ञान. याला आपली शिक्षण व्यवस्था, आजूबाजूचं वातावरण कारणीभूत आहे, असं मला वाटतं. कारण शाळेत भूतदया म्हणजे नक्की काय, याचा अर्थच कधी नेमकेपणाने शिकवला जात नाही. म्हणूनच असेल कदाचित, पण कुत्र्यांना आणि मांजरींना वाईट वागणूक देणारी माणसंच मी जास्त बघत आलो. पण कालांतरानं माझं त्यांच्याविषयी प्रेम, कुतूहल निर्माण झालं आणि नंतर आजतागायत ते कधीच कमी झालं नाही.

  माझ्या आयुष्यात पहिला आला तो जर्मन शेफर्ड ख्रिस. आईपासून ताटातूट झालेलं ते पिल्लू मी मांडीत घेऊन बसलो होतो. ते इतकं कावरंबावरं झालं होतं, की मीच त्याच्यापेक्षा जास्त अस्वस्थ झालो. माझी धांदलच उडत होती त्याला सांभाळताना. मनही सैरभैर झालं होतं त्याचा, त्याच्या आईचा विचार करून. मला त्याला कितपत सांभाळता येईल याची शंका येऊन मी माझ्या तेव्हाच्या भावी पत्नीकडे त्याला सोपवलं. तो सहा महिन्यांचा होईपर्यंत तिनंच त्याला सांभाळलं. तिचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. नंतर ख्रिस आमच्या कंपनीमध्ये आला, तिथेही छान रुळला. आमच्या कंपनीतील कामगारांनी ‘ख्रिस’चा ‘क्रिश’ केला. तो दोन्ही नावांना तो छान प्रतिसाद द्यायचा! मला त्याचा लळा लागला. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याची उत्तम बडदास्त ठेवली, खूप काळजी घेतली, पण माझं हे बाळ अकाली निघून गेलं. खूप रडलो मी त्यावेळी. अर्थात माझ्या रडण्याचं कारण वेगळं होतं. मला सारखी एकच शंका सतावत होती, ती म्हणजे, मी ख्रिसला नक्की सुखाचं आयुष्य दिलं ना? की तो मुका जीव मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि मला ते उमजलंच नाही? ख्रिसनं जिवंत असताना आणि नसतानाही माझ्यातली भूतदया आणि सहानुभूती प्रज्वलित केली. त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.

  खरं तर ख्रिस माझ्याकडे असतानाच मला रॉकी भेटला. तीन महिन्यांचा रस्त्यावरचा रॉकी माझ्या गाडीखाली सावलीसाठी आला होता. त्याला त्वचारोग जडला होता आणि तप्त उन्हामुळे त्याची त्वचा झोंबत होती. त्याचा तो पिळवटणारा स्वर ऐकून मी त्याला घरी आणलं. हा माझा पहिला दत्तक प्राणी. त्याला व्यवस्थित सांभाळलं, परिणामी तो मस्त निरोगी झाला. एकदा का ममतेचे दरवाजे उघडले की पीडित प्राणी आश्रयासाठी येतात, असा अनुभव आहे. माझ्याबाबतीत अगदी तसंच झालं. नवीन प्रोजेक्टमुळे मी भाडय़ाच्या एका जागेत राहायला गेलो, तिथे एका कुत्रीनं तीन गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. तसंच त्या जागेत एक कुत्रा अगोदरपासूनच राहात होता. या पाच जीवांच्या सेवेला मी आणि माझे कामगार सज्ज झालो. एकीकडे ख्रिस आणि रॉकीला सांभाळणं सुरूच होतं. नंतर राहात्या बिल्डिंगमधे तीन मांजरी आल्या, तिथेच रस्त्यावरची दोन कुत्री होती, त्यांचाही सेवेकरी झालो. माणसांमुळेच त्यांची अवस्था दयनीय आहे आणि त्यांची सेवा करणं, हे माझं कर्तव्य आहे याची जाणीव मला खूप आतून झाली आहे.

  नव्या चमूतल्या कुत्री आणि मांजरींना जेव्हा पिल्लं होऊ लागली तेव्हा मात्र मी खिशातले पैसे खर्चून त्यांची नसबंदी करून घेतली. बिल्डिंगमधल्या मांजरींनी तर माझा रक्तदाब फारच वाढवला, कारण त्यांची छोटीशी पिल्लं लिफ्टमध्ये, लिफ्टखाली पडायची शिवाय बिल्डिंगमधल्या चारचाकींखाली यायचा धोका होताच. त्यातच ती पिल्लं इतकी घाण करत होती, की त्यांच्याविषयी तक्रारी येऊ लागल्या. ती घाण साफ करणं माझं कामच झालं. तसंही या पाळीव प्राण्यांची आवड असण्यापेक्षा घृणा असणारेच अनेकजण आजूबाजूला होते. त्यांना या सगळ्याचा त्रास होत होता. मी त्यांच्याशी हुज्जत घालत बसलो नाही. घाण साफ करत राहिलो, प्राण्यांची काळजी घेत राहिलो. दरम्यान एक चांगली गोष्ट झाली. माझ्या शेजाऱ्यांच्या बहिणीनं मांजरींची देखभाल करणाऱ्या केळकरताईंचा संपर्क क्रमांक दिला आणि माझी समस्या संपली. मांजरांची नसबंदी झाली होतीच. त्यामुळे त्यांनीही देखभाल करण्याचे मान्य केले. मी केळकरताईंचे मनोमन आभार मानले, माझा रक्तदाब नॉर्मल ठेवल्याबद्दल!

केळकरताई भेटायच्या सहा महिने आधी काही अनोळखी माणसं माझ्या घराबाहेर दोन देशी जातीची मांजरीची पिल्लं ठेवून निघून गेले. एक महिन्याची होती ती. त्यांचा आवाज ऐकून मी दार उघडलं इतक्यात बिल्डिंगमधल्या एका रहिवाशानं वॉचमनला बोलावून त्यांना बाहेर ‘फेकायला’ सांगितलं. बाहेर पाऊस कोसळत होता आणि ही दोन्ही पिल्लं माझ्या पायाला बिलगली होती, वर चढायचा प्रयत्न करत होती. त्या व्यक्तीचा ‘फेकून दे’ हा शब्द ऐकून माझा जीव गलबलला. समाजमन मेलंय की काय, असं वाटलं. ‘आम्ही त्यांना लांब सोडतो’ असं सांगून ‘मदत’ करणारी माणसंदेखील तेव्हा मला भेटली. ते दोन नवीन जीव घेऊन मी माझ्या कंपनीत आलो. तिथे मुळातच पाच कुत्री होती- खरी मूळची दहा, पण पाच पिल्लं दत्तक गेली होती- अर्थातच प्रेमळ लोकांकडे. कंपनीतल्या ऑफिसमध्ये या मांजरांचं संगोपन सुरू केलं. ती मोठी झाली, बाहेर पडू लागली. त्यातलं एक सर्पदंशानं दगावलं आणि एक दत्तक गेलं, आमच्या नात्यातले पुष्कर आणि स्नेहल यांच्याकडे. पोटच्या पोराहून जास्त या ‘बिट्टी’ची काळजी घेतात दोघं!

   एका वर्षांपूर्वी घाबरून आश्रयाला आलेली आमची कुत्री गायब झाली, पण करोना टाळेबंदीच्या काळात माझ्या पहिल्या कंपनीत नवी चार कुत्री, त्यांची दोन पिल्लं यांची भर पडली. वर्षभरानंतर पालिकेतल्या लोकांबरोबर जुगाड करून, जाळीत धरून या कुत्र्यांची नसबंदी करवली. तर एका कुत्रीला नुकतीच आठ पिल्लं झाली आहेत. अजून किती प्राणीजीव माझ्या आयुष्यात येणार आहेत कल्पना नाही.

   माझा या सोयऱ्या सहचरांबरोबरचा प्रवास ख्रिसबरोबर सुरू झाला तो २०१२ मध्ये. त्यानंतर चार कुत्र्यांना मी त्यांच्या क्रूर मालकापासून सोडवलं आणि योग्य माणसांकडे दत्तक दिलं. तर २०२१ मध्ये जखमी अवस्थेत आलेलं कुत्र्याचं पिल्लू ठणठणीत करून दत्तक दिलं. आजच्या घडीला मी दररोज १२ कुत्री आणि ३ मांजरं यांना योग्य प्रतीचा खाऊ देऊन त्यांची देखभाल करतो. ख्रिसमुळे चालू झालेल्या या प्रवासात मी तीस प्राणीजीव वाचवले, वाढवले, दत्तक दिले. त्यातले बारा जिवंत आहेत, त्याच्यात आठ पिल्लांची भर पडली आहे. या सगळय़ांचे सांगण्यासारखे अनुभव खूप आहेत.

 या सर्व सग्यासोयऱ्यांनी मला खूप काही शिकवलं. त्यांच्या भावना मी जाणून घ्यायला शिकलो, माणुसकीचा, भूतदयेचा नवा अध्याय शिकलो. माणूस म्हणून जगू लागलो! या प्रवासात मोलाची साथ मिळते आहे ती माझ्याकडच्या कामगारांची. माझ्या सेवेत तेदेखील सेवेकरी झाले. ते नसते तर काय झालं असतं, याचा विचारही करवत नाही. आजही रस्त्यानं जाताना सोडून दिलेल्या गायी बघून मन व्याकूळ होतं. त्यांच्यासाठीही काहीतरी करायला हवं असं वाटतं.

  पाळीव प्राणी सांभाळणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे, परदेशी जीव पाळू नका. आपल्या उष्ण कटिबंधीय देशांत त्यांचे हाल होतात. माझ्या ख्रिसचंही तेच झालं. मी त्यासाठी स्वत:ला कदापि माफ करू शकणार नाही. देशी जीव वाढवा, त्यांचं संगोपन करा. त्यांचा अभ्यास करा, त्यांच्याबद्दलचं ज्ञान वाढवा. कुत्र्यामांजरांची नसबंदी करा. कुत्र्यांना कधीही साखळीत अडकवू नका. मदतीची अपेक्षा सोडा. ‘शासन कुचकामी आहे. करोडो रुपये खर्च करून, आपला कर उधळून परिस्थिती ‘जैसै थे’ आहे.’ असे ताशेरे ओढून काय उपयोग? आपण मदत करणं भाग आहे. प्राण्यांची हलाखीची अवस्था मानवामुळे आहे हे विसरू नका..

हा लेख मी लिहायला घेतला तो ख्रिसला- माझ्या पहिल्या बाळाला आदरांजली म्हणून. तो गेल्यावरही मला अनेक गोष्टी शिकवत राहिला! त्याच्यामुळेच तब्बल तीस जीव वाचले आणि आणखीही वाचतील अशी आशा आहे.

धन्यवाद ख्रिस!

pranavlele1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soyare sahchar animal chris dogs and cats companions feelings man ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST