‘‘योगसाधनेमुळे शारीरिक फायदे मिळतातच आणि एकदा का शारीरिक फायदे जाणवायला लागले की माणूस हळूहळू आंतरिक प्रवासाकडे वाटचाल करू लागतो. आजच्या तरुण पिढीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आज कोणत्याही क्षेत्रात जा, अगदी कॉर्पोरेट जगात जा, तिथेही स्पर्धा आहे आणि स्वत:चे ‘स्टार्टअप’ सुरू करा तिथेही स्पर्धा आहे. म्हणूनही असेल कदाचित तरुण वर्ग योगसाधनेकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे.’’ सांगताहेत एमडी, डीजीओ, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ आणि योगतज्ज्ञ डॉ. उल्का नातू आजच्या (२१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त…

आजचा माणूस दु:खी नाही, असं कोण म्हणू शकतं? आताच आजूबाजूला घडलेली काही दु:खाची उदाहरणं बघितली तर… दु:खाची कारणं मानवनिर्मित असतील-नसतील, त्याच्या कारणमीमांसेत नको जायला, पण या दु:खावर मात करण्यासाठी माझ्या हातात एक शस्त्र आहे, ते म्हणजे योगसाधना.

योग उपचार पद्धती जी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आहार, वातावरण आणि हितगूज, याला आम्ही साधनेच्या सप्तधारा म्हणतो, याच्या माध्यमातून तुम्ही योगसाधना करू शकता. योगसाधना किंवा त्याचं कुठलंही अंग एखाद्या थेरपीसारखं काम करत असतं. आसन, प्राणायाम, ध्यानधारणा किंवा यमनियम, हे उपचार म्हणून उपयोगी पडतील का? तर ‘शौच, संतोष, तप, साध्याय, ईश्वरप्रणिधान’ यांच्यामध्ये हे नियम आहेत, जे मनाची शुचिता घडवायला मदत करतात. जेवढं मन शुद्ध असतं तेवढे ते प्रभावशाली असतं. शांत मन हे कुठल्याही आजाराला सामोरं जायला तयार असतं हे आता सिद्ध झालं आहे. माझं मन जितकं सशक्त असेल तेवढी माझी रोगप्रतिकारक शक्ती प्रबळ होते. योगसाधनेच्या माध्यमातून जर मी स्वत:शी नियम केला की, माझ्या मनाची शुचिता मी पाळेन, दुसऱ्याला त्रास देणार नाही, तरी ते खूप आहे.

आज अनेक लोक हेच सांगतात, आमच्याकडे वेळ नाही. धावपळीच्या जगण्यात शांत निवांत वेळ काढणं कठीण आहे, पण तुम्हाला चांगलं आयुष्य हवे असेल तर तो काढायलाच हवा. ‘वेळ नाही’ हा समज चुकीचा आहे. आमचे गुरुजी श्रीकृष्ण व्यवहारे नेहमी म्हणायचे, ‘वेळ आणि कर्ज या दोन गोष्टी काढायलाच लागतात.’ योग ही ‘पार्टटाइम’ करायची गोष्टच नाही. फावल्या वेळात दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं मी योग करते वा करतो, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय अध्याहृत असतं? त्या दहा मिनिटांत मी श्वास रोखते किंवा चार-पाच आसनं करून मोकळी होते किंवा त्या दहा मिनिटांत मी शवासन, योगनिद्रा करते किंवा मी डोळे मिटून ध्यान वा मेडिटेशन करते. चिन्मयानंद म्हणतात, ‘व्हिजिलंट लिव्हिंग इट सेल्फ इज अ साधना’ म्हणजे काय की, क्षणोक्षणी सजगतेनं जगणं ही साधना आहे. हे जर आपण आपल्या अंगामध्ये बाळगायचा प्रयत्न केला तर आपण प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीच्या मागची दुसरी बाजू जास्त सजगतेने पाहायला शिकतो आणि त्यामुळे आपलं ‘सफरिंग’ वा दु:ख कमी व्हायला मदत होते.

मानसिक शांतता तर मिळतेच परंतु शारीरिक लवचीकताही येतेच ना या योगासनांमुळे. योगसाधनेकडे माणसं वळायचं कारण काय? तेच तर आहे. आमच्याकडे एखादी व्यक्ती एक महिन्यासाठी योगवर्गाला येते. पहिल्या आठवड्यात विचारते, ‘मला खाली बसायला जमत नाही, मी खुर्चीत बसून केलं तर चालेल का?’ आम्ही सांगतो, ‘तुम्ही काही करू नका फक्त ऐकलं तरी चालेल.’ दुसऱ्या आठवड्यात ती व्यक्ती हळूहळू खुर्चीवरून उठून खाली बसायला लागते. तिसऱ्या आठवड्यात खाली बसून व्यवस्थित आसनं करायला लागते. चौथ्या आठवड्यात म्हणते, ‘अरे वा, हे छान आहे. मला जमतंय, मी नियमित येते.’ हा आमचा नेहमीचा अनुभव आहे. आता त्या व्यक्तीतला हा जो सूक्ष्म, आंतरिक स्तरावरील सूक्ष्म बदल कशामुळे घडून येतो? काही सकारात्मक संप्रेरकं निर्माण झाली, काही नैसर्गिक वेदनाशामके त्याच्या शरीरात निर्माण झाली की अशा अनुभवजन्य गोष्टी पटायला लागतात. मग ती व्यक्ती दुसऱ्याला सांगते, ‘अरे जाऊन बघ छान वाटतं.’ म्हणजे बघा जर मी एक महिना योगवर्ग केला तर मला इतकं बरं वाटतं तर जर मी आयुष्यभर जीवनशैली म्हणून हे अंगीकारलं तर मला किती वेगळा मोठा फायदा होऊ शकतो? करोनाकाळातील टाळेबंदीपासून योगवर्गाला जाण्याचे लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे कारण आता ऑनलाइन वर्ग घेता येतात. कुठेही जायला-यायला नको. घरच्या घरीच सकाळी काही महत्त्वाची आसने, प्राणायाम, ध्यानधारणा केली की दिवसाला सामोरे जायला माणूस सज्ज होतो. मी स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. कित्येक वर्षे स्त्रियांचे गर्भारपण, बाळंतपण पाहते आहे. या काळातही योगसाधनेचा गर्भारपणावर सकारात्मक परिणाम दिसायला लागतो. बारीकसारीक दुखणी निघून जातात, हा अनुभव आहे. याबाबतीतले तसेच मधुमेहावरचे आमचे ‘घंटाळी मित्रमंडळा’चे अनुभव जागतिक व्यासपीठावर प्रसिद्ध झाले आहेत.

फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटीज् ऑफ इंडिया ( FOGSI) च्या गाइडलाइनमध्ये ‘लाइफस्टाइल व्हेरिएशन’मध्ये ‘योग’ हा विषय जोडला आहे आणि त्यातील एक प्रकरण मी स्वत: लिहिले आहे. आताच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये पीसीओडी हा भारतातला महत्वाचा आजार झाल्यासारखं त्याचे प्रमाण वाढलं आणि वाढतं आहे. जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या रोगांवर योगसाधना हा उत्तम पर्याय आहे. कारण आधी म्हटल्याप्रमाणे योगसाधनेत आहार, विहार, विचार सगळ्या गोष्टींचा विचार होतो. ‘सब दुखोंकी एक दवा’ सारखं हे आहे.

आज मला आनंद आहे, सगळ्या वयोगटातले लोक योगसाधनेकडे वळताहेत. त्यातही तरुण पिढी याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसतेय. त्यांना योगसाधनेमुळे मिळणारे शारीरिक फायदे जास्त आवडतात आणि एकदा का शारीरिक फायदे जाणवायला लागले की, हळूहळू ते आंतरिक प्रवासाकडे वाटचाल करतात. मला वाटतं, सध्याच्या नव्या पिढीला अनेक आव्हानांना सामोरं जायचं असतं. त्याच्यासाठी मन:शांती फारच आवश्यक आहे. आज कोणत्याही क्षेत्रात जा अगदी कॉर्पोरेट जगात जा, तिथेही स्पर्धा आहे आणि स्वत:चे ‘स्टार्टअप’ सुरू करा तिथेही स्पर्धा आहे. म्हणूनही असेल कदाचित तरुणांनी यामध्ये सामील होण्याचं प्रमाण वाढलं आहे. माझ्या ओळखीतला एक अमेरिकेतला मुलगा आहे. तो तिथे मेडिकलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. मुंबईतला ‘हाय इंटेजिलेन्ट कॅटॅगरी’तला एकदम टॉपर मुलगा. म्हणजे बुद्धिमत्तेनं सगळं तावून-सुलाखून घेणारा. पंधरा दिवसांपूर्वी मी अमेरिकेत गेले होते. तिथे मी या मुलांचा योगवर्ग घेतला. त्याला तो वर्ग इतका आवडला की, आमच्या ऑनलाइन वर्गाला यायला त्याने सुरुवात केली. त्याच्या त्या शेड्युलमध्ये त्याचा एक वर्ग चुकला तर अक्षरश: वेडापिसा झाला. मला थेट फोन केला. म्हणाला, ‘आय एम मिसिंग इट.’ म्हणजे कुठे तरी भिडलं ना त्याच्या आंतरिक मनाला.

आज तुम्ही आजूबाजूला ज्या घटना पाहातात त्यात आपला काहीच संबंध नसतानाही अनेकदा आपण अस्वस्थ होतोच. नुकताच झालेला विमानाचा अपघात ऐकून कुठला माणूस हेलावला नसेल? अस्वस्थ झाला नसेल? अशा अनेक घटना घडतच असतात परंतु त्यातून बाहेर पडावंच लागतं, आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्यासाठी जगण्यासाठी काही तरी उद्दिष्ट मिळालं, ध्येय मिळायला हवं.

हल्ली समुपदेशनाकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मला वाटतं, ध्यानसाधना केली की, मन शांत व्हायला लागलं की आपोआपच तुम्हाला स्वत:ची उत्तरं मिळायला लागतात. जेव्हा आपण स्वत्वाकडे प्रवास सुरू करतो तेव्हा आपल्याला आपल्या चुका कळायला लागतात. याला आपण ‘आत्मदर्शन’ म्हणू या. आपणच आपल्याकडे बघायला हवं, कुठे चुकलोय हे शोधून काढायला हवं. काही प्रश्न आपली आपल्यालाच मिळतील.

आपल्यातलं जाणीवनेणिवेच्या पातळीवर असणारं हिंसात्मक रूप बाजूला सारून माणूस म्हणून आनंदी जगण्याच्या पातळीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. मला पैसा मिळतो का? किती मिळतो? मी यशस्वी आहे का? किती आहे, यावर तुमचा आनंद न ठरता तो आतून उमलणारा आनंद हवा. अनेकदा आपण अर्ध आयुष्य यातच घालवतो, की माझ्या वाट्याला दु:ख येतंय. मी कमनशिबीच आहे, हे सगळे तुमच्या मनातले फक्त एक विचार आहेत. त्याच्या उलट वेगळे विचार करण्यासाठीच तर योग – यम, नियम, आसनं, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योग अंगीकारायला हवेत. शिवाय गीतेतला भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोगही अभ्यासायला हवेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याच या गोष्टीचा अभ्यास आपण करायला हवा. कारण आजच्या जगण्याचा मुख्य उद्देश काय तर समत्वाची भाषा आपल्याला आली पाहिजे आणि ती योगसाधनेने येतेच, यावर माझा विश्वास आहे.
ulka.natu@gmail.com