21 October 2020

News Flash

गणपती : समज आणि गैरसमज

गणपती या दैवताविषयी काही समज, गैरसमजही मोठय़ा प्रमाणात आहेत.

कोणत्याही कार्याची सुरुवात श्रीगणेश पूजनाने केली जाते.

गणेश विशेष
शेखर जोशी – response.lokprabha@expressindia.com

चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्रीगणेशाचा उत्सव आता काही दिवसांवर आला आहे. भक्तीभावाने पुजल्या जाणाऱ्या, बुद्धी आणि विद्येची देवता असणाऱ्या गणपती या दैवताविषयी काही समज, गैरसमजही मोठय़ा प्रमाणात आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्येष्ठ पंचांगकर्ते-खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते विद्याधरशास्त्री करंदीकर यांच्याशी बोलून त्याविषयी केलेला ऊहापोह..

कोणत्याही कार्याची सुरुवात श्रीगणेश पूजनाने केली जाते. आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थना आपण गणपतीला मनोभावे करतो आणि त्याचे आशीर्वाद घेतो. म्हणून तर गणपतीला ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ असे म्हटले आहे. माघ महिन्यातही गणेशोत्सव साजरा केला जात असला तरीही मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातच साजरा होतो. भाद्रपद चतुर्थीला गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणपती हा सर्वसामान्यांना आणि भक्तांनाही आपल्या खूप जवळचा वाटत असला तरीही त्यांच्या मनात या लाडक्या गणपतीविषयी काही समज, गैरसमज आहेत. हे समज-गैरसमज सांगोवांगी किंवा अमुक केले तर तमुक होईल अशा भीतीतून चालत आलेले आहेत. ज्याला आपण सुखकर्ता, दु:खहर्ता असे म्हणतो तो आपला गणपती खरोखरच आपल्या भक्तांचे वाईट करेल का, असा सारासार विचारही आपण करत नाही. अकारण अनामिक भीतीपोटी आपण हे समज-गैरसमज दृढ करून घेतो आणि ते वर्षांनुवर्षे, पिढय़ान्पिढय़ा तसेच पुढे चालत राहतात.

उजव्या सोंडेचा गणपती

अनेक चुकीच्या समजुतींपैकी सगळ्यात मोठी गैरसमजूत वर्षांनुवर्षे चालत आली आहे ती म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, त्याचे सोवळे खूप जास्त असते, त्याची पूजा योग्य प्रकारे झाली नाही तर तो कोपतो वगैरे वगैरे. ज्येष्ठ पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण याविषयी म्हणतात, बुद्धिदाता आणि दु:खहर्ता असलेला गणपती त्याच्याच लाडक्या भक्तांकडून काही चूक झाली तर त्याला खरोखरच शिक्षा करेल का? तर त्रिवार नाही.

फक्त गणपतीच नव्हे तर प्रत्येकच देव हा कृपाळू, दयाळू आहे. तो कडक किंवा वाईट नाही. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, अशी अकारण भीती निर्माण केली गेली आहे. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो असे कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. गणपतीच्या डाव्या हातात मोदक असतो आणि उजवा हात आशीर्वादासाठी असतो त्यामुळे गणपतीची सोंड डावीकडे असते. उजव्या सोंडेचा गणपती नवसाला पावतो, असाही एक गैरसमज आहे.

पंचांगकर्ते विद्याधरशास्त्री करंदीकर यांनीही उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, हा गैरसमज असल्याचे सांगितले. आपण डाव्या सोंडेच्या गणपतीची जशी पूजा करतो तशीच उजव्या सोंडेच्या गणपतीचीही पूजा करावी. त्यात काहीही वेगळेपणा नाही. उजव्या सोंडेच्या गणपतीबाबत कधी तरी, कोणाच्या बाबतीत काही अघटित घडले असेल आणि त्याचा संबंध त्याच्या उजव्या सोंडेशी जोडला गेल्यामुळे त्याविषयी भीती आणि गैरसमज पसरले गेले आहेत. पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांनी लिहिलेल्या ‘धर्मशास्त्रीय निर्णय-भाग १’ या ग्रंथातही त्यांनी, उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा गणपती यात काहीही फरक नाही, उगाचच घाबरतात. उजव्या सोंडेच्या गणपतीला दररोज शमी, दूर्वा वाहिल्या पाहिजेत, असे सांगितले जाते पण ते बरोबर नाही. सोंड इकडे वळवली काय किंवा तिकडे वळवली काय, त्याची इच्छा असेल तसे. त्यामुळे माणसाचे काही इष्ट किंवा अनिष्ट होते असे काहीही नाही, असे स्पष्टपणे म्हटले असल्याचा संदर्भही करंदीकर यांनी दिला.

गणपती दैवताविषयी अधिक माहिती देताना करंदीकर म्हणाले, गणपती या देवतेचे वेदकाळापासून महत्त्व असून तेव्हापासून आपण त्याचे पूजन करत आहोत. गणपती हा संकटनाशक असून तो बुद्धिदाता आहे. त्यामुळे प्रत्येक सर्जनशील व्यक्ती किंवा अगदी संतमहात्म्यांनीही आपल्या कलेची साधना करताना, निर्मिती करताना आणि त्याचे प्रकटीकरण करताना श्रीगणेशाचीच उपासना केली आहे. तसे पाहिले तर देवी शारदा (देवी सरस्वती) ही बुद्धीची, विद्येची देवता आहे, असे आपण म्हणतो. पण गणेशामुळे बुद्धी, ज्ञान मिळते आणि ते व्यक्त करण्यासाठी देवी शारदेची मदत लागते. विद्या दुसऱ्याला देण्याची कला ही देवी शारदेमुळे मिळते. शारदा ही वाणीची देवता असून म्हणूनच तिला वाग्देवताही म्हणतात. त्यामुळेच विद्वान व्यक्तीच्या जिभेवर सरस्वती नांदते असेही आपण म्हणतो.

गणेश चतुर्थी हे एक व्रत

गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. याला ‘वरद चतुर्थी’ असेही म्हटले जाते. धर्मशास्त्र आणि पुराणांमध्ये याविषयी अनेक संदर्भ आणि माहिती मिळते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीसाठी आपण स्वत: आपल्या हाताने मातीचा गणपती तयार केला पाहिजे, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. तसेच या मूर्तीची माध्यान्हकाळी पूजा करून, नैवेद्य दाखवून त्याच दिवशी त्याचे विसर्जन करावे, असा उल्लेख पार्थिव गणेशोत्सव व्रतामध्ये आढळतो. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन अर्थात मातीपासून तयार केलेल्यावर मूर्तीचे पूजन करावे, तसेच ही मूर्ती अकरा इंचापेक्षा अधिक मोठी नसावी, असेही शास्त्रातसांगण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील गणपती पूजन हे व्रत आहे. तो कुळाचार (शारदीय नवरात्र, अनंताची पूजा) नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे घरी गणपती आणला जात असेल आणि नंतर काही कारणाने तो आणणे शक्य झाले नाही तर गणपती आणणे बंद केले तरी काहीही हरकत नाही. तसेच आधी दीड दिवस गणपती आणला जात होता आणि आता वाटले की तो जास्त दिवस ठेवावा किंवा याच्या उलट म्हणजे पाच, सात, अकरा दिवसांचे गणपती काही कारणाने बसविणे शक्य झाले नाही तर तो दीड दिवसांचाही केला तरीही चालते. तसेच एखाद्या वर्षी गणपती आणणे शक्य झाले नाही तरी त्यामुळे मनात कोणतीही शंका-कुशंका अजिबात आणू नये आणि पुढच्या वर्षी त्याच उत्साहात गणपती आणावा, असेही करंदीकर यांनी सांगितले.

भाद्रपद महिन्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्त्रात सांगितले गेले आहे. खरे तर पूर्वी तशीच प्रथा, पद्धत होती. पण पुढे काळाच्या ओघात हे बदलले. गणपतीच्या निमित्ताने सर्व वातावरण आनंदी, उत्साही असते. घरी आपले नातेवाईक, मित्र येतात. गणपतीच्या या उत्सवात आपण आपल्या रोजच्या चिंता, दु:ख विसरतो. तसेच आपला समाज हा उत्सवप्रिय असल्याने गणपतीचे विसर्जन त्याच दिवशी न करता तो किमान दीड दिवस तरी ठेवावा, अशी पद्धत सुरू झाली. पुढे हळूहळू दीडवरून पाच, सात असे करत अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसविण्याची पद्धत सुरू झाली, असे सोमण आणि करंदीकर यांनी सांगितले.

काही जणांकडे गणपतीच्या मूर्तीची उंची दर वर्षी इंचाइंचाने वाढवत नेली जाते. पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशी उंची वाढविण्याची काहीही गरज नाही. गणपतीची मूर्ती अकरा इंच ते किमान एक फूट इतक्याच उंचीची असली पाहिजे. काही जणांकडे घरात गर्भवती स्त्री असेल तर तिची प्रसूती होईपर्यंत मूर्तीचे विसर्जन न करण्याची पद्धत आहे. त्यामुळे गर्भाला काही धोका संभवतो असे मानले जाते. मात्र हाही गैरसमज आहे. गणपती विसर्जन आणि गर्भातील बाळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे घरी गर्भवती स्त्री असली तरी गणपती मूर्तीचे विसर्जन हे ठरल्याप्रमाणेच केले पाहिजे. काही जण २१ दिवसांनी गणपतीचे विसर्जन करतात, पण तेही अयोग्य आहे. दीड दिवस ते जास्तीत जास्त अनंत चतुर्दशीपर्यंतच गणपती ठेवून नंतर त्याचे विसर्जन केले पाहिजे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो किंवा चुकून पाहिला गेला आणि दुसऱ्यांच्या घरावर दगड मारला तर तो आळ जातो, असाही एक चुकीचा समज आहे. गणपतीची पूजा महिलांनी करू नये, असाही एक गैरसमज आहे. महिलांनी पूजा केली तरी काहीही हरकत नाही, स्वच्छता बाळगून पूजा करावी. घरी मूर्ती आणल्यानंतर मूर्तीला तडा गेला तर घाबरून जाऊ नये. त्या मूर्तीचे लगेचच विसर्जन करावे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरात कोणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यांकडून लगेचच मूर्तीचे विसर्जन करावे. नेमके गणेशोत्सवाच्या काळातच सुतक येत असेल तर त्या वर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू नये. घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जर सुतक लागले तर अशा वेळी ज्यांना सुतक नाही अशा अन्य कोणाकडून तरी उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जित करावी, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

काही घरी यंदाच्या वर्षी आणलेली मूर्ती वर्षभर तशीच घरात ठेवून पुढच्या वर्षी नवीन मूर्ती आणल्यानंतर त्या जुन्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. खरे तर पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे. पण त्यातील एक भाग असा की, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चाराने करून त्या मूर्तीत देवत्व आणले जाते आणि विसर्जनाआधी मूर्तीची उत्तरपूजाही मंत्रोच्चारानेच करून त्यातील देवत्व काढून घेतले जाते. नंतर त्या मूर्तीत देवत्वच नसते. त्यामुळे एखाद्याला ती मूर्ती घरात शोकेसमध्ये ठेवावीशी वाटली तर केवळ शोभेची मूर्ती म्हणून ती जरूर ठेवावी, पण पुढच्या वर्षी त्या मूर्तीचे विसर्जन करून नवीन मातीच्या मूर्तीचीच पूजा केली जावी. भाद्रपद गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन करू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी चंद्र पाहिला आणि त्यांच्यावर चोरीचा आळ आला, अशी एक पौराणिक कथाही आहे. भाद्रपद महिन्यातील ही चतुर्थी एकमात्र अशी आहे की, त्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. त्यामुळे पंचांगांमध्येही फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी चंद्रास्त दिलेला असतो. इतर चतुर्थीला मात्र आवर्जून चंद्रोदय दिला जातो. एरवी चंद्राचे दर्शन घेऊनच उपास सोडायचा अशी प्रथा आपल्याकडे असल्याचे करंदीकर यांनी सांगितले.

मूळ उत्सवातील पावित्र्य जपावे

गणेशोत्सव मंगलकारक आणि आनंदादायी आहे. आपल्या घरच्या आणि सार्वजनिक गणपतीमुळे अन्य कोणाला त्रास होईल असे वर्तन केले जाऊ नये. काळानुरूप घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात बदल होणे स्वाभाविक असले तरी आपल्या मूळ उत्सवातील पावित्र्य हरवले जाऊ नये. आज सार्वजनिक गणेशोत्सवाला जे स्वरूप आले आहे ते पाहता तो आनंदादायी उत्सव राहिला आहे का? त्यातून खरोखरच आनंद मिळतो का? उत्सवात पावित्र्य आणि मंगलता असते का? यावर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर, सांगली आणि राज्याच्या इतर भागांत यंदा महापुरामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. यंदा गणेशोत्सव साजरा करताना त्याचाही विचार व्हावा. गणेशोत्सवावरील खर्च कमी करून काही भाग पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून द्यावा. गणेशोत्सवामुळे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची आपण सर्वानीच काळजी घ्यावी, असे आवाहनही सोमण, करंदीकर यांनी केले.

वस्तूंची मूर्ती नसावी

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाची अर्थातच मातीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीचीच पूजा करावी, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे माती सोडून अन्य कोणत्याही वस्तूंपासून मूर्ती तयार करू नये. वेगवेगळ्या वस्तूंपासून मूर्ती तयार केली जाते, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे.

कला म्हणून अशी मूर्ती तयार केली तर ठीक आहे, पण अशी मूर्ती पूजेत ठेवू नये. पूजेत शाडूच्या मातीचीच मूर्ती असावी. प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक, थर्माकोल यापासूनही तयार केलेली मूर्ती असू नये. हल्ली काही जण चांदी, तांबे किंवा अन्य तत्सम धातूच्या मूर्तीची पूजा करतात आणि त्याचे विसर्जन न करता त्याच मूर्तीची पुढील वर्षी पूजा करतात. असेही करू नये. कारण पुन्हा तेच, भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश पूजनच करावे, असे सांगितले आहे. आणि तरीही ज्यांना अशा धातूच्याच मूर्तीची पूजा करायची आहे त्यांनी ती करावी, पण त्याबरोबरच अगदी वीतभर किंवा त्याहून छोटय़ा मातीच्या गणपतीच्या मूर्तीची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून, तिची पूजा करून ती मूर्ती विसर्जित केली पाहिजे, असेही करंदीकर आणि सोमण यांनी सांगितले.

विसर्जनात काळानुरूप बदल व्हावा

गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावे, असे सांगितले असले तरी मुळात काही भागांत पिण्याच्या पाण्याचेच दुर्भिक्ष आहे तर तेथे वाहते पाणी कुठून मिळणार? तसेच ज्या वाहत्या पाण्यात नदी, ओढा आपण मूर्तीचे विसर्जन करणार आहोत ते पाणी तरी शुद्ध असायला पाहिजे ना. आज तेही पाणी अस्वच्छ झालेले आहे. पूर्वीच्या काळी घरगुती किंवा सार्वजनिक गणपतींचे प्रमाणही आजच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे ठीक होते. आता काळानुरूप त्यात बदल केला पाहिजे. आपली मूर्ती पर्यावरणपूरक, शाडूच्या मातीचीच आणि किमान एक फूट उंचीची असेल तर तिचे विसर्जन घरच्या घरीही करता येऊ शकेल. अशी मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळते. गेल्या काही वर्षांपासून अनेक कुटुंबांतून या पद्धतीचा अवलंबही केला जात आहे. घरी मोठय़ा बादलीत किंवा पिंपात मूर्तीचे विसर्जन करून नंतर ते पाणी आणि माती बागेतील झाडांना टाकता येऊ शकेल.

पाद्य पूजा, पाट पूजा ‘अर्थ’कारण

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणपतीची ‘पाद्य’ किंवा ‘पाट’ पूजा असे प्रकार सुरू करण्यात आले आहेत. धर्मशास्त्रात किंवा ग्रंथातही अशा पूजेला कुठलीही मान्यता नाही. ‘आमचा गणपती नवसाचा’ हेही मंडळांची प्रसिद्धी करण्यासाठीचे वेगळे तंत्र आहे. नवसाला पावणारा गणपती यालाही शास्त्रात कोणताही आधार नाही. त्यामुळे ही पाद्य पूजा, पाट पूजा यात वेगळे ‘अर्थ’कारण असल्याचे सोमण यांनी सांगितले.

गणपती पूजनाचा यंदाचा मुहूर्त

सोमवार, २ सप्टेंबर २०१९ या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजेसाठी योग्य काळ आहे. या वेळेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करावी, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:07 am

Web Title: ganeshutsav special issue 2019 understanding and misunderstanding about ganapati
Next Stories
1 आग्नेय आशियातील प्राचीन गणेशमूर्ती
2 कोकणातील गणेशोत्सव
3 ‘वैभव’ वारसा
Just Now!
X