मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला मंजूर करण्यात आलेल्या जामिनाविरोधात पाकिस्तान सरकारने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी लख्वी याने न्यायालयात हजर राहावे, असे समन्स त्याच्याविरुद्ध जारी करण्यात आले आहे.
लख्वी याला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्याविरुद्ध सरकारने केलेली याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्या. शौकत सिद्दिकी यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय पीठाने मंगळवारी दाखल करून घेतली.
या प्रकरणात म्हणणे मांडण्यासाठी लख्वी याच्यावर पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याचे मुख्य सरकारी वकीलांनी सांगितले. पुढील सुनावणीची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. लख्वी याला जामीन मंजूर करताना दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११ खटल्यात नोंदविण्यात आलेल्या साक्षींकडे दुर्लक्ष केले, असे सरकारने याचिकेत म्हटले आहे.