News Flash

COVID-19 vaccination in india : लसीकरणाचा विक्रम

केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाचे मोफत लसीकरण करण्यासाठी आजपासून ‘सर्वासाठी मोफत लसीकरण मोहीम’ सुरू केली आहे

| June 22, 2021 03:22 am

धोरणबदलानंतर पहिल्याच दिवशी ८२ लाख जणांना लाभ

नवी दिल्ली : करोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे.

देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. यापूर्वी एकाच दिवशी ४८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम होता, तो आज मागे टाकत दिवसभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरणात आले.

एका दिवसातील विक्रमी लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करताना, लस हे करोनाशी लढण्याचे आपले प्रभावी अस्त्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांचे लसीकरण झाले त्यांचे अभिनंदन आणि सर्वाच्या लसीकरणासाठी आघाडीवर काम करणाऱ्यांचा हा सन्मान आहे, असेही मोदी म्हणाले.

केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाचे मोफत लसीकरण करण्यासाठी आजपासून ‘सर्वासाठी मोफत लसीकरण मोहीम’ सुरू केली आहे. या मोहिमेचा सर्वाधिक लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणाईला होईल. आपण सर्वानी लसीकरणाची प्रतिज्ञा करू या. आपण संघटितपणे करोनाचा पराभव करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

सर्वासाठी मोफत लसीकरण मोहिमेनुसार केंद्राकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, लसीकरणातील प्रगती आदी निकषांनुसार लसामात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मोहिमेत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

आजपासून १८ वर्षांपुढील सर्वाचे लसीकरण : राजेश टोपे 

मुंबई : राज्यात आज, मंगळवारपासून १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी के ली. १८ वर्षांवरील युवक-युवतींनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही टोपे यांनी के ले.

मुंबईत मोठी रुग्णघट : मुंबईत सोमवारी मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. दिवसभरात ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी २६ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

राज्यात ‘डेल्टा प्लस’चे २१ रुग्ण

करोनाच्या उत्पपरिवर्तीत विषाणूचे (डेल्टा प्लस ) २१ रुग्ण राज्यात आढळले आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्य़ात नऊ, जळगाव जिल्हा सात, मुंबईत दोन, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

चीनमध्ये १०० कोटी नागरिकांचे लसीकरण

सुमारे १४० कोटी लोकसंख्येच्या चीनने आतापर्यंत १०० कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी ही माहिती जाहीर केली. गेल्या केवळ पाच दिवसांत १० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. परंतु दोन्ही लसमात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या मात्र चीनने प्रसिद्ध केली नाही.

राज्यात ६,२७० नवे रुग्ण

’राज्यात दिवसभरात ६,२७० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर ९४ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी १३ हजार ७५८ रुग्ण करोनामुक्त झाले.

’ राज्यातील उपचाराधीन रूग्णांची संख्या एक लाख २४ हजार ३९८ आहे.

’गेल्या २४ तासांत मुंबईत ५२१, कोल्हापूर जिल्हा ९१९, सांगली १०१९, रायगड ५२३, रत्नागिरी ४६६, सिंधुदुर्ग ४७४, सातारा ४३७ आणि  पुणे ग्रामीणमध्ये ३३९ रुग्ण आढळले.

लसीकरणाचा आजचा विक्रमी आकडा आनंददायी आहे. लसीकरणाच्या या टप्प्याचा मोठा लाभ गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणाईला होईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 3:22 am

Web Title: 82 lakh people vaccinated on the first day after the policy change zws 70
Next Stories
1 तमिळनाडू आर्थिक सल्लागार परिषदेवर डुफ्लो, राजन
2 Ghaziabad Muslim man assaulted : गाझियाबादप्रकरणी ट्वीटबंदी !
3 जो बायडेन यांना भेटणार नाही – इब्राहिम रइसी
Just Now!
X