देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल अभिनेता आमीर खान याने व्यक्त केलेल्या मताशी ‘ऑस्कर’प्राप्त प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी सहमती दर्शविली. काही महिन्यांपूर्वी आपल्याविरुद्ध एका मुस्लिम गटाने फतवा काढला होता. त्यावेळी आपणही असहिष्णुतेच्या वातावरणाचा सामना केला होता, असे रेहमान यांनी म्हटले आहे.
गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी रेहमान पणजीमध्ये आले आहेत. त्यावेळी आमीर खान याने केलेल्या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, असहिष्णुतेच्या वातावरणाचा आपणही सामना केला आहे. सुसंस्कृत समाजात कोणत्याही नागरिकांनी हिंसक होता कामा नये. हिंसेचा कोणत्याही स्थितीत विरोधच केला गेला पाहिजे. त्यातूनच आपण जगाला सुसंस्कृत असल्याचे दाखवून देऊ शकू, असे त्यांनी सांगितले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
‘मोहम्मद : मेसेंजर ऑफ गॉड’ या इराणी चित्रपटासाठी रेहमान यांनी संगीत दिले होते. त्यावेळी मुंबईतील रझा अकादमीने त्यांच्याविरोधात फतवा काढला होता. या फतव्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रेहमानचे कॉन्सर्टही रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी असहिष्णुतेचा सामना केल्याचे म्हटले होते.