News Flash

दीर्घ प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी

देशभर जल्लोष, दिरंगाईवरून पाकविरोधात संतप्त भावना

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी भारतात प्रवेश केला. त्यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील भारतविषयक अधिकारी डॉ. फरिहा बुग्ती याही अभिनंदन यांच्याबरोबर पाकिस्तानी हद्दीपर्यंत होत्या.

देशभर जल्लोष, दिरंगाईवरून पाकविरोधात संतप्त भावना

नवी दिल्ली : शक्य तितकी दिरंगाई करीत पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी रात्री सुटका केली. पंजाबातील वाघा सीमेवर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र तातडीने त्यांना मोटारींच्या ताफ्यातून अज्ञात स्थळी नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन यांच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना त्यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते.   त्यावेळी पॅराशूटद्वारे उतरत असलेल्या अभिनंदनला पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चित्रफितीही पाकिस्तानने जारी केल्या होत्या. त्यात त्यांना मारहाण झाल्याच्या खुणाही जाणवत होत्या. भारताने या चित्रफितींना जोरदार आक्षेप घेत, जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.

अर्थात हे शांततेच्या दिशेने पाकिस्तानने टाकलेले पहिले पाऊल आहे, अशी बतावणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. तसेच भारताकडे चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आधी अतिरेकी गटांवर ठोस कारवाई करा, मगच चर्चेचा विचार करू, असे भारताने त्यांना ठणकावले होते. त्यानंतर गेले दोन दिवस अभिनंदन यांच्या सुटकेकडे देशाचे लक्ष लागले होते.

शुक्रवारी दुपारी बारा वाजता अटारी सीमेवरून ते मातृभूमीवर पाऊल ठेवतील, असे आधी जाहीर झाले होते,  त्यामुळे सकाळपासूनच या सीमेवर प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर, सेनादलांचे तसेच प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि हजारो नागरिक जमले होते. अभिनंदन मातृभूमीवर पाऊल टाकत असल्याचा क्षण साठवण्यासाठी जो तो धडपडत होता. मात्र संध्याकाळही उलटून रात्र झाली, तरी अभिनंदन भारतात न आल्याने लोकांमधील तणाव आणि उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पाकिस्तान करीत असलेल्या दिरंगााईबद्दलही संतप्त भावना व्यक्त होत होती. अखेर रात्री नऊनंतर अभिनंदन यांना घेऊन पाकिस्तानचे अधिकारी आणि सैनिक येत असल्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून दिसताच देशभर आनंदाचे वातावरण पसरले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही अभिनंदन यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

मायदेशी परतल्याचा आनंद!

मायदेशी परतलो त्याचा आनंद वाटतो, हे पहिले उद्गार होते अभिनंदन वर्धमान यांचे! पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले तेव्हा आपल्या देशवासियांना पाहून अभिनंदन यांची ही पहिली प्रतिक्रिया होती.  अभिनंदन यांचे वडील निवृत्त एअर मार्शल एस. वर्धमान हेदेखील चेन्नईहून अमृतसरला दाखल झाले होते.

वेळेत दोनदा बदल अभिनंदन यांच्या सुटकेची वेळ पाकिस्तानने शक्य तितकी लांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुटकेच्या वेळेत पाकिस्तानने दोनदा बदल केला होता. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सीमेवर जमलेल्या हजारो लोकांचा जीव टांगणीला लागला होता.

वैद्यकीय तपासणी

अभिनंदन हे एका विमान अपघातातून वाचले आहेत. त्या अपघाताचा ताण मनावर असतानाच शत्रूच्या तावडीत सापडल्याचाही तणाव त्यांच्या वाटय़ाला आला. तेथील तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम झाला आहे का, हे तपासणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम त्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाईल, असे एअर व्हाईस मार्शल आर जी के कपूर यांनी पत्रकारांना सांगितले. इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास त्यांनी नकार दिला.

पाकची धुसफूस, सुषमांचा प्रहार

अबुधाबी : इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (ओआयसी) परिषदेत भारताचे निमंत्रण कायम ठेवल्याबद्दल पाकिस्तानने बहिष्कार टाकला. परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या परिषदेस आपण जाणार नाही, असे जाहीर केले. पाकिस्तानचे कनिष्ठ अधिकारी मात्र परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केल्याने कुरेशी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या परिषदेत पाकचे नाव न घेता स्वराज यांनी दहशतवादावर हल्ला चढवला. दहशतवाद हाच जगासमोरचा सर्वात मोठा धोका आहे, असे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:37 am

Web Title: abhinandan return iaf pilot abhinandan varthaman returned to india
Next Stories
1 भारतात परतल्यावर चांगलं वाटतं आहे, अभिनंदन यांची पहिली प्रतिक्रिया
2 ’26/11 च्या हल्ल्यानंतर काहीच झाले नाही, आम्ही पुलवामा आणि उरीचा बदला घेतला’
3 काश्मीरमध्ये पाच जवान शहीद ; एका नागरिकाचाही मृत्यू
Just Now!
X