उत्तर प्रदेशात एक पत्रकार आणि त्याच्या मित्राची हत्या करण्यात आली आहे. बलरामपूरमध्ये करण्यात आलेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बहादूरपूर येथे जंगलातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. ललित मिश्रा, केशवानंद मिश्रा उर्फ रिंकू आणि अक्रम अली अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनीही चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
३५ वर्षीय पत्रकार राकेश सिंग आणि त्यांचा मित्र पिंटू राहू यांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. बलरामपूरचे पोलीस अधिक्षक देवरंजन वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केशवानंद याची आई गावाची प्रमुख होती. राकेश सिंगने त्यांनी केलेला घोटाळा उघड केला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. चर्चा करण्याच्या निमित्ताने आरोपी राकेश सिंग यांच्या घऱी गेले होते. यावेळी त्यांनी राकेश सिंग आणि त्यांच्या मित्राला मद्य पाजलं आणि गुन्हा केला. घर जाळण्यासाठी आरोपींकडून अल्कोहोल असणारं सॅनिटायजर वापरण्यात आलं, जेणेकरुन हा अपघात आहे असं वाटावं”.
“केमिकलच्या सहाय्याने घर जाळण्यासाठी ललित मिश्रा आणि केशवानंद मिश्रा यांनी अक्रम अली उर्फ अब्दुल कादिरची मदत घेतली. अशा प्रकारचे गुन्हे त्याने याआधीही केले होते,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राकेश सिंग एका स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करत होते. आगीमध्ये राकेश सिंग यांचा मित्र पिंटू साहू गंभीररित्या भाजला होता. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राकेश सिंग ९० टक्के भाजले होते. लखनऊ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. राकेश सिंग यांच्या वडिलांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने कुटुंबाला पाच लाखांची मदत दिली आहे.