उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ आज (रविवार) सकाळी भयंकर दुर्घटना घडली. चमोली जिल्ह्यातील रैनीत येथील जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला असून, धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाल्याने परिसरात जलप्रलय आला. त्यामुळे नदीकाठावर असलेल्या घरांना याचा तडाखा बसला आहे. शिवाय, आतापर्यंत सात मृतदेह हाती लागले असून, अद्यापही १७० जण बेपत्ता आहेत. दरम्यान, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, आयटीबीपीच्या जवानांना १६ जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

आयटीबीपीच्या जवानांनी तपोवन येथील २५० मीटर लांब बोगद्यात फसलेल्या १६ जणांचा जीव वाचवला आहे. याशिवाय अन्य ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना देखील वाचवण्याचं काम जवानांकडून सुरू आहे.

तर, केंद्रीयमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत ट्वटिद्वारे माहिती देताना सांगितलं की, हिमकडा कोसळल्याने घडलेल्या प्रकोपात आयटीबीपीच्या जवानांनी चमोली-तपोवनच्या एका बोगद्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. या संकटात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी व दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या सर्व संस्था सर्वोतोपरी कार्य करत आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितल्यानुसार, जवळपास १२५ जण बेपत्ता असून, शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

उत्तराखंड राज्य सरकारकडून  मृतांच्या कुटुंबास चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती, मुख्यमंत्री रावत यांनी दिली आहे. तर, केंद्र सरकारकडून दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.