भारतीय विद्यार्थी संघटने (एनएसयूआय)चे राष्ट्रीय महासचिव नागेश करिअप्पा यांनी देशाचे केंद्राय गृहमंत्री अमित शाह हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थी नेते असलेल्या नागेश यांनी संसद मार्गावरील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह हे कोविड १९ च्या काळात बेपत्ता झाले आहेत आणि नागरिक संकटात आहेत आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

देशातल्या राजकारण्यांनी संकटकाळात पळून न जाता देशाची सेवा करायला हवी. “जेव्हा देशात धोकादायक साथीचा रोग पसरला आहे आणि नागरिक संकटात आहेत, तेव्हा संपूर्ण देशाची जबाबदारी घेणे हे राजकारण्यांचे कर्तव्ये आहे” असे या तक्रारीत म्हटले आहे.

“२०१३ पर्यंत देशातील नागरिक ही राजकारण्यांची जबाबदारी होती. २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. या महामारीच्या काळात देशातील सर्वात शक्तिशाली आणि जबाबदार व्यक्ती बेपत्ता आहे,” असे पक्षाचे राष्ट्रीय सचिव लोकेश चुघ  म्हणाले.

“अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की फक्त भाजपाचे?” असा सवाल नागेश करिअप्पा यांनी केला आहे. सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे आणि म्हणूनच एनएसयूआयने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असे करियाप्पा यांनी सांगितले. सरकारच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत असेही ते म्हणाले.

दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलीस एनएसयूआयच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी चुघ आणि करिअप्पा यांनी बोलावले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस आल्याचे एनएसयूआयने सांगितले.

“मंत्री बेपत्ता असल्याचे सांगून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्यानंतर पोलिस एनएसयूआयच्या कार्यालयात गेले आणि या प्रकरणाची चौकशी केली. ही एक चेष्टा आहे आणि पोलिस अशा तक्रारीवर कारवाई करणार नाहीत,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.