लडाख सीमेवर चीनबरोबर दीर्घकाळ तणावाची स्थिती कायम राहणार आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्कराने आपल्या बाजूने पूर्ण तयारी केली आहे. पुढच्या एक-दोन महिन्यात लडाखमध्ये कडाक्याची थंडी पडेल. त्या प्रतिकुल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी फॉरवर्ड भागात तैनात असणाऱ्या जवानांसाठी आवश्यक साहित्य पोहोचवण्यता आले आहे.

यामध्ये उब निर्माण करणारी उपकरणे, वातावरण अनुकूल कपडे, रेशन, इंधन आणि तंबूचा समावेश आहे. चीनला लागून असलेल्या पूर्व लडाख सीमेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. काही भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. त्यांच्यामध्ये फक्त काहीशे मीटरचे अंतर आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

हिवाळयात लडाख भागात पारा शून्य डिग्रीपर्यंत खाली घसरतो. बर्फ मोठया प्रमाणात जमा होत असल्याने, थंडीच्या मोसमात काही भागांचा काही महिन्यांसाठी उर्वरित देशाशी संपर्क तुटलेला असतो. दोन्ही देशांचे सैन्य अधिकारी, मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या पण सीमेवर अजूनही तणाव कायम आहे. उलट चीनकडून सैन्य तैनाती, शस्त्रास्त्रांची संख्या वाढवण्यात येत आहे. भारतही कुठे गाफील नाहीय. चीनच्या तोडीस तोड सैन्य तैनाती केली आहे.

हिवाळा लक्षात घेता, भारतीय सैन्य अन्न धान्य, दारुगोळा आणि इंधनाचा साठा करत आहे. “रेशन, इंधन, तंबू, हीटर, दारुगोळा यांचा पुरेशा प्रमाणात साठा करण्यात आला आहे” असे फायर अँड फ्युरी कोरचे प्रमुख मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले.