हिमाचल प्रदेशात झालेल्या हिमस्खलनाला चोवीस तास उलटल्यानंतरही बर्फाखाली गाडल्या गेलेल्या ५ जवानांना अद्यापही बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेले नाही. बुधवारी चीनच्या सीमेनजीक किनौर जिल्ह्यातील शिपका ला सेक्टरमध्ये झालेल्या या हिमस्खलनात लष्कराच्या गस्ती पथकातील ५ जवान गाडले गेले होते.

फुटलेली पाण्याची पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी लष्कराचे १६ जवान बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिपकी ला या बॉर्डर पोस्टवर गेले होते. यावेळी अचानक हिमस्खलन झाले. या घटनेमध्ये राकेशकुमार (वय ४१) हा जवान शहीद झाला आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील घुमरपूर गावचे ते रहिवासी होते. हे जवान 7JAK रायफल्सच्या युनिटचे सदस्य होते.

चोवीस तासांनंतरही या भागात बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. लष्कर आणि आयटीबीपीच्या १५० जवानांच्या पथकाकडून गाडल्या गेलेल्या या जवानांचा शोध घेतला जात आहे. या कामात स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणावर सुरु असलेली बर्फवृष्टी आणि पाऊस यांमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. बुधवारी रात्री या भागात बर्फाचा ४ ते ५ इंचाचा थर साचला होता, पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.

ज्या ठिकाणी हे हिमस्खलन झाले ते शिपकी ला सेक्टर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १३,००० फूट उंचीवर आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून हे ठिकाण ३०० किमी अंतरावर आहे.