नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी, कलम ३५ अ आणि ३७० हटवले जाऊ नये, या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे. हे हटवण्याची काहीच गरज नाही. आम्ही भारतीयच आहोत मात्र आमच्यासाठी ही कलमं महत्वपूर्ण आहेत, असे सोमवारी संसदे बाहेर माध्यामांशी बोलतांना म्हटले.

याच्या एकदिवस अगोदरच मध्य काश्मीरमधील गंदरबेल जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी काश्मीर घाटीत तैनातीसाठी पाठवण्यात आलेल्या दहा हजार जवानांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. शिवाय राज्यात तत्काळ विधानसभा निवडणूक व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले होते.

राज्यात सध्या शांततापुर्ण वातावरण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवण्यात आल्याने संशय निर्माण होत आहे. जनतेच्या मनात दहशत का निर्माण केली जात आहे?. जर कलम ३५ हटवले जात असेल तर घटनेच्या प्रत्येक कलमाला हटवावे लागेल व त्यांना १९४७ च्या काळात पुन्हा जावे लागेल, असेही त्यांना सांगितले होते.