असहिष्णुतेच्या आरोपाला राज्यसभेत प्रत्युत्तर देत आणीबाणीची आठवण; टीकेला काँग्रेसचेही उत्तर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हिटलरच्या आडून काँग्रेसवर शरसंधान साधल्याचे चित्र शुक्रवारी राज्यसभेत पाहायला मिळाले. असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून केंद्राला झोडपणाऱ्यांना प्रत्युत्तर देत जेटली यांनी हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी जर्मनी आणि इंदिरा गांधींची आणीबाणीपूर्व राजवट यांच्यातील साम्यस्थळांकडे निर्देश करत राज्यसभेत काँग्रेसची कोंडी केली. तीसच्या दशकात सत्तेवर आलेल्या हिटलरच्या राजवटीत दिल्या गेलेल्या ‘हिटलर म्हणजेच जर्मनी, जर्मनी म्हणजेच हिटलर’ या घोषणेकडे लक्ष वेधत त्यांनी संसद सदस्यांना गांधींच्या कार्यकाळातील ‘इंदिरा म्हणजेच भारत, भारत म्हणजेच इंदिरा’ घोषणेचे अप्रत्यक्षरीत्या स्मरण करावयास लावले.
संसदेत राज्यघटनेवरील विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सरकारी हल्ला अधिक तिखट करताना जेटली यांनी नाझी जर्मनीतील हिटलरच्या कृतींचे स्मरण करून दिले. इतिहासाला उजळणी देताना त्यांचा उद्देश मात्र इंदिरा यांनी लादलेल्या आणीबाणी पर्वातील लोकशाही मूल्यांच्या संकोचावरच होता. जेटली म्हणाले की, राज्यघटना धाब्यावर बसविण्यासाठी घटनात्मक संस्थांचाच कसा वापर करण्यात येतो, याची वाईट उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत. त्यात सर्वाधिक भयावह उदाहरण १९३३ मध्ये जर्मनीत लादण्यात आलेल्या आणीबाणीचे आहे. जर्मन संसदेला आग लावण्याचा विरोधकांचा डाव असल्याची बतावणी करत हिटलरने ही आणीबाणी लागू केली. विरोधकांचे अटकसत्र आरंभले, माध्यमस्वातंत्र्यावर बंधन आणले आणि २५ कलमी आर्थिक विकासाचा कार्यक्रम लागू केला. कुठल्याही सरकारी निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असा कायदा मंजूर केला. या काळात हिटलरचा सल्लागार रुडॉल्फ हेस याने ‘हिटलर म्हणजेच जर्मनी, जर्मनी म्हणजेच हिटलर’ अशी घोषणा दिली.
त्यानंतर जगाच्या इतर प्रदेशांत काय झाले, त्यावर जर्मनीने कधीही स्वामित्वहक्क दाखवला नाही, असा टोमणा मारत जेटली यांनी काँग्रेस सदस्यांना इंदिरा यांच्या आणीबाणी पर्वाची आठवण करून दिली.

राज्यसभेत शुक्रवारी चर्चेवेळी अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

हिटलर आठवतो; नेहरू का नाहीत?
‘तुम्हाला जर्मन राज्यघटना आठवते. हिटलरसारख्या हुकूमशहाबद्दल बोलता, पण पंडित नेहरूंसारख्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाच्या योगदानाबद्दल बोलण्यास मात्र तुम्हाला लाज वाटते, यालाच असहिष्णुता म्हणतात, अशी जळजळीत टीका विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत जेटलींच्या भाषणानंतर केली. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात भाजपचा स्वत:चा कुठलाही नेता सहभागी नव्हता. त्यामुळेच नेताजी बोस, सरदार पटेल आणि नेहरूंसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांबद्दल विवादास्पद बोलून भाजप संघर्षांचे वातावरण निर्माण करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप-संघ परिवारातील अनेक मंडळींना राज्यघटना मान्य नाही. आता ते तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्धता दाखवत असतील, तर ही चांगली गोष्ट असून ते ‘देर आए, दुरुस्त आए’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आपण जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली होती, याची आठवण आझाद यांनी करून दिल्यानंतर दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आझाद यांचे कौतुक केले. त्यावर समझौता, मालेगाव, हैदराबादसारख्या दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारांविरोधात कारवाई केल्यानंतर आपणसुद्धा तुमचे कौतुक करू, अशी कोपरखळी त्यांनी मारली.