केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या आजारी असून लवकरच त्यांची किडनी ट्रान्सप्लांट केली जाणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून घरुनच काम करण्यास सांगण्यात आले आहे. इतकेच नाही मंगळवारी (दि.३) अरुण जेटलींना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासही जाता आले नाही. सोमवारी त्यांचा कार्यकाळ संपला आहे. उत्तर प्रदेशातून त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड झाली आहे.

दरम्यान, केंद्रीय संसयदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी जेटलींना राज्यसभेत सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात यावी यासाठी राज्यसभा सभापतींकडे यासंदर्भातील पत्र सोपवले होते. यापूर्वीही २०१४ मध्ये जेटलींची सभागृह नेते म्हणून निवड झाली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी जेटलींना घरुनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. किडनी ट्रान्सप्लांट होणार असल्याने संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनंतरच अरुण जेटलींची बॅरियाट्रिक सर्जरी झाली होती. त्यांचे वजन कमी करण्यासाठी ही सर्जरी करण्यात आली होती.

जेटली अनेक काळापासून मधुमेहाने देखील त्रस्त आहेत. ६५ वर्षीय जेटलींना याच आठवड्याच्या शेवटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर सर्जरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अपोलो रुग्णालयातील डॉ. संदीप गुलेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक ही सर्जरी करणार आहे. ते एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांचे भाऊ असून जेडलींचे फॅमिली डॉक्टर आहेत.

मोदी सरकारमधील जेटली हे एकमेव मंत्री नाहीत ज्यांची किडनी ट्रान्सप्लांट होणार आहे. यापूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये सुषमा स्वराज यांची देखील एम्समध्येच किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. त्याचबरोबर माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देखील सध्या स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर अमेरिकेमध्ये उपचार सुरु आहेत.