एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले राजस्थानचे मंत्री बाबूलाल नागर यांचा राजीनामा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वीकारला असून तो मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविला आहे. या आरोपानंतर नागर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गेहलोत यांच्या सरकारमध्ये दुग्धोत्पादन आणि खादी उत्पादन राज्यमंत्री असलेल्या नागर यांनी या महिलेला आपल्या निवासस्थानी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
बलात्काराच्या आरोपावरून राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा
‘‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. या आरोपाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा, यासाठी नैतिकता म्हणून मी राजीनामा देत आहे. या तपासातून सत्यच बाहेर येईल आणि मी निर्दोष असल्याचे सिद्ध होईल,’’ असे नागर यांनी सांगितले होते. गेहलोत यांनी नागर यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो मंजुरीसाठी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांच्याकडे पाठवला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी मोहंमद यासिन यांनी सांगितले.