मला अटल बिहारी वाजपेयींचा फारसा सहवास लाभला नाही. पण अटलजींचे जे कार्यकर्तुत्व आहे त्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. अटलजींनी जे कार्य केले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अटलजींच्या श्रद्धांजली सभेत बोलताना सांगितले. वृक्ष मोठा होतो तेव्हा काहीजणांना त्याची सुगंधी फुले हवी असतात तर काहींना फळे हवी असतात. प्रत्येकजण आपल्याला हवे तो ते त्या वृक्षाकडून घेत असतो.

देणे हा वृक्षाचा स्वभाव आहे. मनुष्याला जे हवे ते तो त्या वृक्षाकडून घेत असतो. हाच वृक्ष रोपटयाच्या स्वरुपात असताना त्याला सुर्याच्या गरमीपासून बरेच काही सहन करावे लागते. त्या सर्व प्रक्रियांमधून गेल्यानंतर तो एका वटवृक्षाचा आकार घेतो. अटल बिहारी वाजपेयींचे भाजपासाठी कार्य सुद्धा असेच आहे असे मोहन भागवत म्हणाले.

मला अटलजींचा सहवास फार लाभला नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्याबद्दल आकर्षण होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा मी सुद्धा त्यांचे भाषण ऐकायला जायचो असे भागवत म्हणाले. अटलजींनी सार्वजनिक जीवनात व्यस्त असतानाही सामान्य माणसाबरोबर संबंध जपले. संघाच्या स्वयंसेवकांनी आयुष्यात कसे रहावे याचा उत्तम वास्तुपाठ वाजपेयींनी घालून दिला आहे असे भागवत म्हणाले.

कठिण, खडतर प्रसंगांचा सामना करताना अविचल राहून त्यांनी आपल्या धेय्याकडे वाटचाल केली. सर्वांना मित्र बनवले. अटलजींबद्दल सगळयांच्या मनात एक विश्वासाची भावना होती. अटलजींनी स्वत:ला समाजाशी जोडून घेतले होते. कठिण परिस्थितीचा सामना करताना त्यांच्यातला कवी, संवेदनशील माणूस नेहमी जागृत राहिला. जीवनाचा सामना करणारा ते एक वीर पुरुष होते. त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही असे भागवत म्हणाले.