गेल्या एक वर्षाहून जास्त काळ भारतात आणि जगभरात करोना ठाण मांडून बसला आहे. या काळात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जशा घटना घडल्या, तशाच माणुसकीवरचा विश्वास अजून बळकट करणारे देवदूतही! भोपाळमध्ये गेल्या १८ वर्षांपासून रिक्षा चालवणारे जावेद खान हे अडचणीत सापडलेल्या करोना रुग्णांसाठी असेच देवदूत ठरले आहेत! रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे किंवा रुग्णवाहिकेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याची असंख्य प्रकरणं देशात घडत आहेत. अनेकदा रुग्णांना मिळेल त्या वाहनातून रुग्णालयात नेण्याची वेळ नातेवाईकांवर ओढवते. अशाच घटनांमुळे मन हेलावलेल्या ३४ वर्षीय जावेद खान यांनी स्वत:ची रिक्षाच थेट ऑक्सिजन रुग्णवाहिकेत रुपांतरीत केली आहे. आणि या ‘रुग्णवाहिके’तून ते रुग्णांना मोफत सेवा देतात!

 

हृदयद्रावक! बेड नसल्याने तीन रुग्णालयांनी दिला नकार, रिक्षामध्ये पत्नी तोंडाने ऑक्सिजन देत राहिली पण…

जावेद खान सांगतात…

“गेल्या १८ वर्षांपासून मी रिक्षा चालवतो आहे. खरंतर माझ्या कुटुंबातल्या कुणालाही करोनाची लागण झालेली नाही. पण करोनामुळे होणारे मृत्यू पाहून मी फार विचलित झालो होतो. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून मला यावर काहीतरी करण्याची इच्छा होती. मला कुटुंबीयांनी माझी रिक्षाच रुग्णवाहिकेत रुपांतरीत करण्याचा सल्ला दिला. मी रिक्षात सॅनिटायझर ठेवलंय, काही औषधं ठेवली आहेत आणि एक ऑक्सिजन सिलेंडर देखील ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांत मी ९ रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं आहे”, असं सांगताना जावेद खान यांच्या डोळ्यात समाधान दिसतं.

 

गुरुग्राम : रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे रिक्षा, कार झाल्या शववाहिन्या!

सेवेसाठी पत्नीचा दागिना विकला!

ही आगळी-वेगळी रुग्णवाहिका बनवण्यासाठी पत्नीने स्वत:हूनच त्यांना तिचं सोन्याचं लॉकेट दिल्याचं जावेद कान सांगतात. दररोज ६०० रुपयांचा ऑक्सिजन त्यांना भरावा लागतो. ते सांगतात, “ऑक्सिजन रिफिल करणं हे महाकठीण काम असतं. दररोज त्यासाठी किमान ४ ते ५ तास मला रांगेत थांबावं लागतं.” खान यांनी इतर प्रवाशांना रिक्षातून नेणं बंद केलं आहे. जेणेकरून त्यांना पूर्णपणे रुग्णांवर लक्ष केंद्रीत करता येईल. सोशल मीडियावर देखील त्यांनी आपल्या सेवेविषयी माहिती दिली आहे. लोकं त्यांना तिथे फोन करून त्यांची सेवा घेतात. या सेवेसाठी जावेद खान एक रुपया देखील आकारत नाहीत.

करोनाबाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षांची धाव

जावेद खान यांच्याकडून अशीच सेवा घेतलेले शौमिक दत्त यांनी आपला अनुभव टाईम्स ऑफि इंडियाशी बोलताना शेअर केला आहे. ते म्हणाले, “मी भोपाळमधल्या जेके रुग्णालयात होतो. रात्री ११ वाजता मला डिस्चार्ज मिळाला. जावेद तिथे आले आणि त्यांनी मला माझ्या घराजवळ सोडलं. मी पैसे देत असूनही त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला.”