एआयएमआयएमचे प्रमुख आणि लोकसभेतील खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी चीनचा निषेध केला आहे. “पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन बरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या तीन वीरांच्या पाठिशी संपूर्ण भारत उभा आहे. शहीद झालेले कर्नल आणि दोन वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे” असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

“कमांडिंग ऑफिसर स्वत: पुढे राहून नेतृत्व करत होते. या सैनिकांचे बलिदान वाया जाता कामा नये, सरकारने चीनच्या या कृतीचा बदला घेतला पाहिजे” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

काय घडलं ?
मागच्या काही दिवसात दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार चिनी सैन्य गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट १४,१५ आणि १७ ए मधून मागे हटेल असं ठरलं होतं. चिनी सैन्य मागे सरकत देखील होतं. पण पूर्णपणे त्यांना ताबा सोडला नव्हता. काल चिनी सैन्य पूर्णपणे माघारी फिरेल असा निर्णय झाला होता. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये ठरल्यानंतरही चिनी सैन्याने मागे फिरण्यास नकार दिला. त्यानंतर ही हिंसक झडप झाली.