अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात होणार असून, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरू असून, हा कार्यक्रम देशवासीयांना घरबसल्या बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं अयोध्येतून थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वृत्तवाहिनीवरून केलं जाणार आहे.

राम मंदिराच्या पायाभरणीसाठी तारीख व वेळ निश्चित करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाविषयी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाविषयी ट्विट केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार आहेत,” असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं म्हटलं आहे.

विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनीही कार्यक्रमाविषयी ट्विट केलं असून, “पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत असतील आणि संत, विश्वस्त व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी पूजा करतील”, असं म्हटलं आहे. अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

ऐतिहासिक निकाल…

अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला होता.

हा निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले होते. न्यायालयाच्या निर्णयप्रमाणे केंद्र सरकारनं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास स्थापना केली. तसेच अध्यक्ष आणि विश्वस्तांची नेमणूक केली. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू होण्याच्या दृष्टीनं पावलं पडली होती.