अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांकडून सुरुवातीला कोर्टाबाहेर तडजोड होऊ न शकल्याने गेल्या २३ दिवसांपासून याप्रकरणाची सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी सुरु झाली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मध्यस्थीद्वारेच या प्रकरणावर तोडगा निघावा यासाठी दोन्ही पक्षकारांनी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या मध्यस्थी पॅनलला पत्र लिहिले आहे.

सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होण्यापूर्वी कोर्टाने मध्यस्थीने यावर तोडगा निघावा यासाठी एका पॅनलची स्थापना केली होती. या पॅनलद्वारे तोडगा काढण्यासाठी १५५ दिवस प्रयत्न झाले मात्र, यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या या पॅनलमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्या. एफ. एम. कलीफुल्ला, वरिष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर या तीन व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, पॅनलद्वारेही तोडगा निघू न शकल्याने अखेर सुप्रीम कोर्टात याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय़ झाला.

या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर मुस्लिम पक्ष आता आपली बाजू मांडत आहे. पाच सदस्यांच्या घटनापीठाद्वारे या प्रकरणाची सुनावणी सुरु असून यामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली न्या. एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्ड ज्यांनी या वादग्रस्त जमिनीवर आपला मालकी हक्क सांगितला आहे, त्यांनीच मध्यस्थेसाठी पत्र लिहीले आहे. त्यांनी म्हटलंय की, चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याची पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर, निर्वाणी आखाड्याने देखील चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याची इच्छा व्यक्त करीत पॅनलला पत्र लिहिले आहे. निर्वाणी आखाड्याच्या भुमिकेवर या प्रकरणातील एक पक्षकार निर्मोही आखाडा देखील सहमत आहे.