पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ आणि भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरावरून आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जनता विद्रोह करण्यासाठी रस्त्यावर येईल, इतकेही सरकारने पेट्रोलचे दर वाढवू नयेत, असे स्वामी यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’शी बोलताना स्वामी म्हणाले की, मला वाटतं की, अर्थशास्त्रानुसार पेट्रोलच्या किमती या ४० रूपये असायला हव्यात. पंतप्रधानांनी पेट्रोलियम मंत्र्यांना सांगितले पाहिजे की त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाप्रमाणे नव्हे तर अर्थ मंत्रालयाप्रमाणे विचार करायला हवा. त्यांनी पेट्रोलच्या किमती इतक्या ही जास्त ठेवू नये की लोक विद्रोह करतील, असा इशारा त्यांनी दिला.

जेव्हा क्रूड ऑईलच्या किमती वाढतात तेव्हा इंधनाच्या किमती वाढल्या पाहिजेत हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे आणि मी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाजूने नाही. कारण यात फक्त दोन लोकांचा (उत्पादक आणि विक्रेता) समावेश असतो. पण इथे संपूर्ण अर्थव्यवस्था सहभागी आहे. त्यासाठी स्थुल अर्थशास्त्र आहे, असे स्वामी म्हणाले. स्वामी यांनी यापूर्वीही सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. भारतात पेट्रोल ४० रूपये लिटर दराने विकले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. ४० रूपयांपेक्षा जास्त दर असेल तर जनतेचे शोषण होते, असे ते म्हणाले होते.