बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात असलेले उद्योगमंत्री श्याम रजक यांची जदयूकडून हकालपट्टी करण्यात आली. ते राजदमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनंतर पक्षानं ही कारवाई केली. त्यानंतर रजक यांनी राजदमध्ये प्रवेश केला असून, जदयूनं तीन आमदारांना पक्षाचं द्वार खुल करत राजदला धक्का दिला आहे. हे तिन्ही आमदार लवकरच जदयूमध्ये प्रवेश करणार आहे.

श्याम रजक यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर काही वेळातच राजदचे तीन आमदार जदयूमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं. राष्ट्रीय जनता दलानं श्याम रजक यांना पक्षात घेत संयुक्त जनता दलाला झटका दिला होता. त्याची परतफेड जदयून काही तासातच केली आहे.

सासाराम मतदारसंघाचे राजदचे आमदार अशोक कुमार कुशवाह यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राजदनं पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी प्रेमा चौधरी, महेश्वर यादव आणि फराज फातमी यांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं होतं. हे तिन्ही आमदारही जदयूमध्ये प्रवेश करणार आहेत.

चार आमदारांपैकी तीन आमदार आजच जदयूमध्ये प्रवेश करणार आहे. तर फराज फातमी हे तूर्तास प्रवेश करणार नाहीत. राजदनं पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून पक्षातून निलंबित केलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्या सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती, असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर हे तिन्ही आमदार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जदयूमध्ये दाखल होणार असल्याची चर्चाही काही दिवसांपासून सुरू होती.