शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपासोबत जे केलं त्यामुळे या दोन पक्षांमध्ये काडीमोड झाला आहे का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावेळी अमित शाह यांनी उत्तर दिलंय की असं अद्याप पक्षाने काहीही ठरवलेलं नाही. तसंच या ठिकाणी मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही. मात्र तूर्तास शिवसेनेसोबत काडीमोड झाला आहे हे पक्षाने ठरवलं नाही असं उत्तर अमित शाह यांनी दिलं. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिलं.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि शिवसेनेने भाजपासोबत न जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याच कार्यक्रमात विचारण्यात आले तेव्हा अमित शाह म्हणाले की भाजपाचा महाराष्ट्रात पराभव झाला असं मला मुळीच वाटत नाही. मात्र शिवसेनेने जे काही केलं त्यामुळे आम्हाला बाजूला केलं गेलं असंही ते म्हणाले. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात प्रचार करत होतो तेव्हाही आम्ही महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच होतील असं जाहीर केलं होतं. शिवसेनेने जे काही दावे केले होते त्यात काही तथ्य नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं हे ठरलं नव्हतं असंही अमित शाह यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

याच कार्यक्रमात त्यांनी CAA आणि NRC बाबतही भाष्य केलं. CAA वरुन विरोधकांनी देशात चुकीचे संदेश पसरवले आणि देशातलं वातावरण पेटवलं असा आरोप अमित शाह यांनी केला. झारखंड येथील पराभव मी स्वीकारतो. भाजपाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यामुळे पराभव स्वीकारणं ही माझी जबाबदारी आहे. जसा मी विजयाचं श्रेय घेऊ शकतो तशीच पराभवाची जबाबदारीही घेऊ शकतो असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शिवसेनेबाबतचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा शिवसेना आमच्या पक्षाच्या विचारांशी मेळ असलेला पक्ष आहे. त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत असं वक्तव्य फडणवीस यांनीही केलं होतं. ज्यानंतर संजय राऊत यांनी दरवाजे नाही तर खिडकीही लावून घ्या आता वेळ निघून गेली असं प्रत्युत्तर दिलं होतं.