कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत चिथावणी देणारं भाषण केल्याप्रकरणी भाजपा आमदार संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावमध्ये प्रचारसभेत बोलताना संजय पाटील यांनी ही निवडणूक रस्ते, पाणी यासंबंधी नसून हिंदू – मुस्लिम घटनांसंबंधी आहे असं वक्तव्य केलं होतं. संजय पाटील बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत.

‘ही निवडणूक रस्ते, पाणी आणि इतर मुद्द्यांवर नाहीये. ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद अशी आहे’, असं संजय पाटील बोलले होते. ‘आपल्या छातीवर हात ठेवून मी सांगतोय की हा भारत आहे आणि हे हिंदूराष्ट्र आहे. राम जिथे जन्माला आला तो हा देश आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत’, असंही ते बोलले होते. संजय पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली होती.

व्हिडीओत संजय पाटील बोलताना दिसत आहेत की, ‘मी संजय पाटील आहे. मी एक हिंदू आणि हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि आम्हाला राम मंदिर बांधायचं आहे. जर काँग्रेस उमेदवार लक्ष्मी आम्ही मंदिर बांधू शकतो असं म्हणत असतील तर त्यांना मत द्या. त्या मंदिराच्या जागी मशीद बांधतील. ज्याला कोणाला बाबरी मशीद, टीपू जयंती हवी आहे त्यांनी काँग्रेसला मत द्यावं. आणि ज्यांना शिवाजी महाराज आणि राम मंदिर हवं आहे त्यांनी भाजपाला मत दिलं पाहिजे’. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे आणि १५ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.