01 March 2021

News Flash

दिल्लीत पार्टीमध्ये भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांना शिवीगाळ, FIR दाखल

माझ्यासोबत गैरवर्तन आणि माझी छळवणूक केली.

पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या शाझिया इल्मी यांनी बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार अकबर अहमद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दिल्लीत वसंत कुंज येथे चेतन सेठ यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमात अकबर अहमद यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप शाझिया इल्मी यांनी केला आहे. पोलिसांनी शाझिया इल्मी यांच्या तक्रारीवरुन अकबर अहमद यांच्याविरोधात कलम ५०६ (धमकावणे) आणि कलम ५०९ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. शाझिया इल्मी दिल्ली भाजपाच्या उपाध्यक्ष आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकार, प्रसिद्ध वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले आहे.

“मला या विषयाला जास्त प्रसिद्धी द्यायची नाही. माझ्यासोबत गैरवर्तन आणि माझी छळवणूक केल्याबद्दल मी अहमद यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. चेतन सेठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी अकबर अहमद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते माझा अपमान करत होते. हिंदीमध्ये त्यांनी मला शिवीगाळ केली. असे लोक सुटता कामा नयेत, त्यांना अद्दल घडली पाहिजे” असे शाझिया इल्मी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाल्या.

या विषयावर अकबर अहमद यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्हाला तक्रार मिळाली आहे. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करु असे दक्षिणपश्चिम दिल्लीचे डीसीपी इंगित प्रताप सिंह म्हणाले.

वसंत कुंज येथे डिनर समारंभासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. तिथे काही राजदूत सुद्धा उपस्थित होते, असे इल्मी यांनी तक्रारीत म्हटले आहे. रात्री ९.३० च्या सुमारास त्या कृषी कायदे तसेच भारत-दक्षिण अमेरिकेतील व्यापार संधीच्या विषयावर बोलत होत्या. त्यावेळी अकबर अहमद यांनी पंतप्रधान आणि भाजपाबद्दल काही वाईट वक्तव्य केली, असा आरोप इल्मी यांनी केला आहे.

“अहमद यांनी शिवीगाळ केली, तेव्हा सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जेवायला बसल्यानंतर अकबर अहमद यांनी पुन्हा काही गलिच्छ वक्तव्य केली. इल्मी यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आंतरराष्ट्रीय उच्चाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरुच ठेवली” असे अधिकाऱ्याने सांगितले.

“रात्री ११ च्या सुमारास अकबर अहमद यांनी पुन्हा शाझिया इल्मी यांना अपशब्द सुनावले. त्यामुळे भावनिक झालेल्या इल्मी यांना अश्रू आवरणे कठिण झाले, या सर्व प्रकारचा तिथे उपस्थित असलेल्या परदेशी पाहुण्यांनाही धक्का बसला. त्यानंतर इल्मी तिथून बाहेर पडल्या व सीआर पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली” अशी माहिती अधिकाऱ्याने तक्रारीच्या आधारावर दिली. पाच फेब्रुवारीला ही घटना घडली आणि सात फेब्रुवारीला त्यांनी तक्रार नोंदवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 1:14 pm

Web Title: bjps shazia ilmi accuses ex bsp mp of misbehaving with her fir filed dmp 82
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या मोडलेल्या झोपेची कहाणी; आधी डास चावले, नंतर मोटारीसाठी धावले!
2 “भाजपा सरकारने आठवड्यातील त्या दिवसाचं नाव ‘अच्छा दिन’ करायला हवं”
3 धडकी भरवणारी आकडेवारी; २७ दिवसांनंतर पहिल्यांदाच करोनाबाधितांची संख्या १४ हजारांवर
Just Now!
X