पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यात सीबीआयने आता दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी याला वॉन्टेड आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सीबीआयने या घोटाळा प्रकरणात आणखी एक १२ हजार पानी चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये नीरव मोदीपाठोपाठ मेहुल चोक्सीलाही वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान याआधी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सोमवारीही आरोपपत्र दाखल केले. बँकेच्या तत्कालीन प्रमुख आणि अलाहाबाद बँकेच्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम यांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रात नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी, सुभाष परब यांच्या घोटाळ्यातील सहभागाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र मेहुल चोक्सीचे नाव त्या चार्जशीटमध्ये कुठेही नव्हते. आता दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये मेहुल चोक्सीचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उषा अनंतसुब्रमण्यन २०१५ ते २०१७ या कालावधीत पीएनबीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या प्रकरणात त्यांची चौकशी देखील झाली आहे.