सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत लागणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसईने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. बोर्डांना गुणांबाबत निकष ठरवण्याचा अधिकार असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सीबीएसईला दहावी आणि बारावीच्या उर्वरित बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्याचं परिपत्रक काढण्याची संमती दिली आहे.

परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सर्वोच्च न्यायलयात सीबीएसई दहावी आणि बारावीचा बोर्ड निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सीबीएसईला रद्द झालेल्या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी मूल्यांकन योजनेची अमलबजावणी करण्यास परवानगी दिली आहे. संयम भारद्वाज यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवण्यासाठी पर्यायी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल असं सांगितलं.

सीबीएसई मूल्यांकन योजनेत बोर्ड परीक्षेतील शेवटच्या तीन पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण गृहित धरणार आहे. संयम भारद्धाज यांनी जर विद्यार्थ्यांनी पर्यायी परीक्षा देण्याचा पर्याय निवडला तर त्याआधारे अंतिम गुण ठरवले जातील असं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.