घुसखोरीच्या मुद्दय़ावरून ओमर अब्दुल्लांची टीका
पाकिस्तानने घुसखोरी केली तर अरेरावीची भाषा करायची, त्यांच्याशी संबंध तोडून टाकण्याची धमकी द्यायची.. मात्र, चीनने असा प्रकार केला तर त्यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या करायच्या, त्यांच्याशी वाटाघाटी करायच्या.. घुसखोरीच्या बाबतीत असा दुटप्पीपणा सोडून दोन्ही आततायी शेजाऱ्यांबाबत एकसमान भूमिका घ्या आणि त्यांच्याशी त्यांना समजेल याच भाषेत बोला असा सल्ला दिला आहे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी.
लेह-लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दौलतबेग ओल्डी या ठिकाणापर्ययत घुसखोरी करून चिनी सैन्याने तळ ठोकला आहे. या मुद्दय़ावरून भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू झाला असताना अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाला लक्ष्य केले आहे. कथुआ जिल्ह्य़ातील जाहीरसभेत बोलताना त्यांनी या मुद्दय़ावरून केंद्र सरकारचा समाचार घेतला.  पाकिस्तानने घुसखोरी केली तर त्यांच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकायची भाषा  करायची, हेच मात्र चीनने केले तर त्यांच्याशी चर्चेचे गुऱ्हाळ लावायचे हा दुटप्पीपणा केंद्र सरकारने सोडून द्यावा आणि खमकी भूमिका घेऊन उभयतांशी या मुद्दय़ावर बोलावे असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिला.
काश्मीर खोऱ्यातील जनतेने दोन दशकांपासून दहशतवादाचा मुकाबला केला आहे. आता कुठे खोऱ्यात शांतता प्रस्थापित होऊ पहात आहे. मात्र, पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजाऱ्यांकडून या प्रक्रियेला खीळ बसवण्याचेच उद्योग सुरू असतात. घुसखोरी हाही त्यातलाच प्रकार आहे. खोऱ्यातील सीमावर्ती भागातील जनता कष्टकरी आहे, त्यांना शांततेने जीवन जगायचे आहे. मात्र, अशा प्रकारांनी त्यांना त्रास होतो. त्यांची शांतता तर भंग पावतेच शिवाय त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच केंद्र सरकारने पाकिस्तान आणि चीन यांच्या घुसखोरीला कायमस्वरूपी पायबंद घालावा व त्यासाठी ठोस भूमिका घेऊनच उभय देशांशी चर्चा करावी असे ते म्हणाले.