नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व लोकसंख्या सूचीबाबत (एनपीआर) सध्या देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे. या कायद्याबद्दल भाजपाकडून एकीकडे जनजागृती केली जात असताना दुसरीकडे विरोधीपक्षांकडून याचा जोरादार विरोध केला जात आहे. परिणामी सामान्य नागरिक अजूनही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत आहे. याशिवाय समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह सेलिब्रेटींची याबाबत विविध मत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सुपरस्टार रजनीकांत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्या(सीएए) व लोकसंख्या सूची(एनपीआर)चे समर्थन केले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याचा आपल्या देशातील कोणत्याही नागरिकांवर परिणाम होणार नाही. जर हा मुस्लीमांवर परिणाम करणार असेल तर मी पहिला व्यक्ती असेल जो  त्यांच्यासाठी उभा राहील. देशाबाहेच्या नागरिकांबाबत माहिती मिळवण्यासाठी एनपीआर आवश्यक आहे. एनआरसीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की आतापर्यंत हे तयार करण्यात आलेले नाही. असं रजनीकांत यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रिया देशभरात लागू करण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. लोकसभेत लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. एनआरसी देशभरात लागू करण्याची कोणती योजना आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तर देत सांगितलं की, “सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर एनआरसी प्रक्रिया लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”.