मध्य प्रदेशातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास मज्जाव करावा, अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल रामनरेश यादव यांच्याकडे केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणीच्या पूर्वसंध्येवर चौहान यांना मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची मनाई करावी, अशी मागणी आपण राज्यपालांची भेट घेऊन केल्याचे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कांतिलाल भुरिया यांनी सांगितले.अशा प्रकारे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करणे असंवैधानिक आहे. मंत्रिमंडळाची बैठक ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी कोणतेही  कारण नाही, असेही भुरिया यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशात ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री काळजीवाहू असल्याने या कालावधीत अशी बैठक घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.