News Flash

हे खरं वसुधैव कुटुंबकम्! अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देशांचा भारताला मदतीसाठी पुढाकार!

करोनाविरोधातल्या लढ्यात जगभरातल्या देशांनी भारताला मदत देण्याची तयारी दर्शवली आहे!

भारतात गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे. भारतात करोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारताला करोनाविरोधातलं युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.

जगभरात करोनाचं संकट गेल्या वर्षभराहून अधिक काळ थैमान घालत आहे. जगातल्या प्रत्येक देशाला करोनाचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी ८ त ९ महिने जगाला वेठीला धरल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीपासून करोनानं थोडी उसंत घेतली होती. या काळात करोनाची लस देखील आल्यामुळे करोनाविरोधातल्या लढाईत मोठी मदत मिळू लागली. मात्र, आता पुन्हा एकदा करोनानं उचल खाल्ली असून भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आणि मृत्यू होऊ लागले आहेत. त्यामुळे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, पुरशी आरोग्य व्यवस्था यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच व्यापक लसीकरण सुरू असल्यामुळे भारताला लसींचा देखील तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या अनेक देशांनी भारताला मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून शत्रुत्व निभावणाऱ्या पाकिस्तानचा देखील समावेश असल्यामुळे करोनासमोर खऱ्या अर्थाने जगाचं रूप वसुधैव कुटुंबकम् झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे!

 

व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलिवन यांनी यासंदर्भात ट्वीट करून आश्वासक भाष्य केलं आहे. “भारतात करोनाच्या रुग्णवाढीमुळे अमेरिकेला नक्कीच चिंता वाटू लागली आहे. आम्ही भारताला मदत पुरवण्यासाठी २४ तास काम करत आहोत. भारत या संकटाचा धैर्याने सामना करत आहे”, असं ट्वीट सलिवन यांनी केलं आहे.

 

तर दुसरीकडे अमेरिकेचे गृहमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी देखील ट्विटरवरून पाठिंबा दिला आहे. “करोनाच्या या संकटात आम्ही भारतासोबत आहोत. भारतातील लोकांसाठी आणि तिथल्या आरोग्य सेवकांसाठी आम्ही वेगाने अतिरिक्त मदत पाठवणार आहोत”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी, “कोविड-१९ शी लढा देणाऱ्या भारतीयांना मला एकतेचा संदेश द्यायचा आहे. या लढ्यामध्ये फ्रान्स तुमच्यासोबत आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत”, असं ट्वीट केलं आहे.

 

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्लस मायकेल यांनी देखील भारताला पाठिंबा दिला आहे. “युरोपियन संघ भारतीयांसोबत या लढ्यामध्ये उभा आहे. हे संकट सर्वांवरच आलं आहे. ८ मे रोजी होणाऱ्या भारत-युरोप समिटमध्ये भारताला कशा पद्धतीने मदत करता येईल, याविषयी आम्ही चर्चा करू”, असं मायकेल म्हणाले आहेत.

 

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मारिस पेने यांनी भारताला पाठिंबा दर्शवताना म्हटलं की, “आम्हाला लस पुरवण्यामध्ये भारताची भावना नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी आपण एकत्र मिळून काम करत राहू.”

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी देखील चीन भारताला मदत करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. “भारताला जी गरज लागेल, त्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही त्यासंदर्भात भारताशी चर्चा करत आहोत”, असं लिजियान यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील भारतीय करोनाविरधात देत असलेल्या लढ्याचं कौतुक केलं आहे. “आपण या जागतिक संकटाचा सर्व मानवजात मिळून सामना करायला हवा. जगभरात करोनाचा सामना करणारे सर्वजण लवकर यातून बाहेर पडावेत अशी आमची प्रार्थना आहे”, असं इम्रान खान म्हणाले आहेत. यासोबतच युएई, सिंगापूर, रशिया यांनी देखील करोनाशी संबंधित सामग्री आणि शक्य ती सर्व मदत भारताकडे पाठवण्याची तयारी दाखवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 5:31 pm

Web Title: countries across the world pours in help for india against covid 19 fight pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय?”
2 “ ‘सिस्टम’ फेल आहे…” म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा!
3 Lockdown In Delhi: दिल्लीत लॉकडाउन वाढवला; केजरीवाल सरकारचा निर्णय
Just Now!
X