पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची संस्था असणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती केली आहे. हे फटाके केवळ पर्यावरणपूरक नाहीत तर इतर पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत स्वस्तही आहेत. सीएसआयआरच्या वैज्ञानिकांनी या फटाक्यांची निर्मिती केली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

सेफ वॉटर रिलीजर (स्वॅस), सेफ मिनिमल अॅल्युमिनिअम (सफल), सेफ थर्माइट क्रॅकर (स्टार) अशी सीएसआयआरने निर्मिती केल्या फटाक्यांची नावे अशी आहेत. या फटाक्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. हे फटाके पेटवल्यानंतर त्यातून पाण्याच्या वाफा बाहेर येतात त्यामुळे हवेतील धुळ थोपवण्याचे काम करते तसेच फटाक्यातून निर्माण होणारा धूर या पाण्यात विरघळून जातो. मात्र, तरीही पारंपारिक फटाक्यांप्रमाणेच या फटाक्यांचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर सीएसआयआरने ‘ई-क्रॅकर्स’ आणि ‘ई-लडी’ देखील विकसित केले आहे. यामुळे ज्यांना प्रत्यक्ष प्रदुषणाला हातभार लावायचा नाही. मात्र, फटाक्यांचा आनंदही घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे ई-फटाके बनवण्यात आले आहेत.

स्वॅस, स्टार आणि सफल या फटाक्यात पोटॅशिअम नायट्रेट, सल्फर आणि अॅल्युमिनिअम यांसारख्या घातक रसायनांचे कमीत कमी उत्सर्जन होते. त्यामुळे पारंपारिक फटाक्यांपेक्षा या घातक पदार्थांच्या उत्सर्जनाचे प्रमाण सुमारे ४० टक्क्यांपर्यंत कमी आहे. या सर्व फटाक्यांचा आवाज पारंपारिक फटाक्यांइतकाच येतो. त्याची आवाजाची क्षमता १०५ ते ११० डेसिबल आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने या फटाक्यांची चाचणी पेट्रोलिअम अॅण्ड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून (पेस्को) करण्यात आली आहे.

भारतीय फटाका क्षेत्राची ६००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. यासाठी देशातील ५ लाख कुटुंबांना प्रत्यक्ष आणि अप्रत्य़क्षरित्या या उद्योगामुळे रोजगार उपलब्ध होतो. सीएसआयआरचे फटाके निर्मित क्षेत्रात उतरण्याचा एकमेव हेतू होता तो म्हणजे प्रदुषण कमी करणे होय. यामुळे बरेच फटाका उत्पादक प्रयोगशाळेत या नव्या संशोधीत फटाक्यांमध्ये रुची दाखवली आहे.

फटाक्यांमध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. फटाक्यांची चाचणी ‘सीएसआयआर’ आणि ‘निरी’मध्ये होत आहे, यामध्ये हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी काम केले जात आहे. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.