राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम-विषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याच्या योजनेतून ‘व्हीआयपीं’ना वगळण्याचा  ‘आम आदमी पक्षाचा’ निर्णय म्हणजे ढोंगीपणा आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी केली आहे.
‘सम आणि विषम मार्ग! त्यांनी अपवादाची समान यादी बनवली आहे. हा संपूर्णपणे ढोंगीपणा आहे. जर हा कायदा जनहितासाठी लागू करण्यात येत असेल तर व्हीआयपी असले तरीही सर्वांनीच त्याचे पालन करायला हवे‘, असे म्हणत वढेरा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे.
नववर्षांत दिल्लीकरांना शिस्तीचे धडे देणारा हा उपक्रम १ ते १५ जानेवारीदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. यानुसार १ जानेवारीपासून एक दिवस आड वाहने रस्त्यावर धावणार. सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांचा समावेश. वाहनाचा अखेरचा क्रमांक सम असल्यास सम तारखेला तर विषम असल्यास विषम तारखेला वाहन रस्त्यावर आणण्यास परवानगी. उदा. १,३,५,७,९,० असल्यास विषम तर २,४,६,८ असल्यास सम तारखेला वाहन रस्त्यावर आणता येईल. १५ जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबविणार. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नियम लागू राहणार. तसेच, यात १२ वर्षांच्या मुलासह वाहन चालविणाऱ्या महिलांना सूट मिळेल. केवळ महिलाच असलेल्या कारलादेखील सूट मिळेल. परंतु पुरुषसोबत असल्यास दंड स्वीकारला जाईल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्षा, केंद्रीय मंत्री तसेच सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांना सूट मिळेल. मात्र, केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ या नियमातून सूट घेणार नाहीत.