पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय स्तुत्य आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय करण्यात आली, अशी टीका भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशांविरोधातील सर्जिकल स्ट्राइक असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जाते आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांचाही समाचार घेतला आहे. ‘जर ते या कारवाईला सर्जिकल स्ट्राइक म्हणत असतील, तर त्यांना सर्जिकल स्ट्राइकनंतर घडलेल्या घडामोडींच्या परिणामांसाठी सज्ज राहायला हवे होते,’ असा टोला शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या टिकेला राज्यसभेत प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार पियुष गोयल यांनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला होता. ‘आम्ही आमच्या निर्णयाला सर्जिकल स्ट्राइक म्हणत नाही. काँग्रेस या निर्णयाला सर्जिकल स्ट्राइक म्हणते आहे. आमच्या निर्णयाला काँग्रेसने प्रशस्तीपत्रक दिले आहे,’ असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. पियुष गोयल यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या या विधानानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला सर्जिकल स्ट्राइकवरुन घरचा आहेर दिला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरुन शत्रुघ्न सिन्हा यांना मोदी सरकारला लक्ष्य केले. नोटा बँकेत जमा करताना, त्या बदलून घेताना लोकांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख सिन्हा यांनी केला.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन सत्ताधारी भाजपला विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातदेखील धारेवर धरले आहे. विरोधकांनी संसदेचे कामकाज बंद पाडण्याची एकही संधी सोडलेली नाही. नोटाबंदीवर चर्चा व्हावी आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घ्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे.