डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा रामरहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे आणि त्यांना आता सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
#FLASH Panchkula’s Special CBI Court finds Dera Chief Ram Rahim Singh guilty of rape. #RamRahimVerdict pic.twitter.com/RzzfthzVZr
— ANI (@ANI) August 25, 2017
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बाबा राम रहिम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याचा आणि त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. २००१-२००२ च्या दरम्यान हे प्रकरण घडलं होतं, त्यानंतर इतरही अनेक वादांमध्ये राम रहिम अडकले आहेत. २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र यांची हत्या झाली होती त्याचाही आरोप बाबा राम रहिम यांच्यावर आहे. बाबा राम रहिम यांनी लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचं प्रकरण हे सर्वात आधी पत्रकार रामचंद्र यांनीच समोर आणल्याची चर्चा आहे.
२०१२ मध्ये डेरा सच्चा सौदाच्या ४०० पुरूष अनुयायांची नसबंदी केल्याचाही आरोप बाबा राम रहिम यांच्यावर आहे. लाखो अनुयायांचा वाढता पाठिंबा आणि हजारो अनुयायी पाठिंब्यासाठी पंचकुलामध्ये दाखल होणं यांच्या बळावर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना शिक्षा होणार नाही असं मानलं जात होतं. मात्र ती शक्यता आता पूर्णपणे संपली आहे. बाबा रामरहीम यांना दोषी ठरविण्यात आलं आहे.
कोण आहेत बाबा राम रहिम?
१९६७ मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहिम यांना तेव्हाचे डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी २३ सप्टेंबर १९९० मध्ये आपला वारसदार जाहीर केले, त्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी बाबा राम रहिम हे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख झाले. बाबा राम रहिम यांच्याकडे डेरा सच्चा सौदाची जबाबदारी आल्यानंतर डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता प्रचंड वाढली. बाबा राम रहिम यांना सिनेमात काम करण्याचाही छंद आहे.
राम रहिम यांनी स्वतःला लोकांपुढे देव म्हणून सादर केले आणि त्यांची लोकप्रियता शिख समाजात मोठ्या प्रमाणावर वाढली. कारण प्रमुख झाल्यापासूनच सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश दिला. ज्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये संख्या वाढत गेली.
बाबा राम रहिम हे आपल्या बाबा या प्रतिमेच्या आडून अनेक अशी कामं करत होते जी बेकायदा होती आता १५ वर्षांपूर्वी लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी बाबा राम रहिम यांना दोषी ठरविण्यात आलं आहे.. डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला दोषी ठरविण्यात आल्यानं शिख समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे पंचकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.