देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याची परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज लाखाच्या जवळपास करोना बाधित लोक आढळून येत आहेत. सरकारनं चाचण्या वाढवण्यावर जोर दिल्यानंही ही आकडेवारी वाढत असल्याचं दिसून येत असून टाटा समूहानं सीएसआयआरच्या सहकार्यानं विकसित केलेली फेलुदा कोविड टेस्टिंग किटच्या बाजारात आणण्यास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिली आहे. फेलुदा ही कमी किंमतीतील कोविड टेस्टिंग किट आहे.

टाटा समूह आणि सीएसआयआर-आयजीआयबीनं विकसित केलेली फेलुदा ही पहिली व्यावसायिक कोविड टेस्टिंग किट आहे. केंद्रीय औषध नियंत्रक विभागानं ही किट बाजारात आणण्यास परवानगी दिल्यानंतर सीएसआयआरनं याविषयी माहिती दिली.

“टाटा समूहानं सीएसआयआर-आयजीआयबी व आयसीएमसोबत या कोविड किटसंदर्भात काम केलं. जेणेकरून एक चांगल्या दर्जाची किट तयार करता येईल, ज्याचा जलद चाचण्या करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल. हे मेड इन इंडिया उत्पादन असून, जे सुरक्षित आहे. विश्वासार्ह असण्याबरोबर आर्थिकदृ्ष्ट्या परवडणारे आहे,” असं आयएसआयआरनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

देशाचा रिकव्हरी रेट सुधारला

देशात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी देखील दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट(बरे होणाऱ्यांचे प्रमाण) ७९.६८ टक्क्यांवर पोहचला आहे. मागील २४ तासांत देशभरात ९४ हजार ६१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, मागील सलग दोन दिवस ९४ हजारांपेक्षा अधिकजणांनी करोनावर मात केलेली आहे.