सलग १५ वर्षांपासून विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसला यंदा मध्य प्रदेशात विजयाची चांगली संधी आहे. पण पक्षांतर्गत मतभेदांचा पक्षाला फटका बसू शकतो. विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना तिकिट वाटपावरुन हे मतभेद अधिक तीव्र होत चालले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: बुधवारी पक्षातील हे गटातटाचे राजकारण अनुभवले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक वादावादी झाली.

राहुल यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु असताना हा प्रकार घडला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. ज्योतिरादित्य सिंदिया मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आहेत. दिग्विजय सिंह समन्वय समितीचे प्रमुख आहेत. मध्य प्रदेशमधील काँग्रेस उमेदवार निश्चित करण्यासाठी निवडणूक समितीची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. २८ नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये मतदान होणार आहे.

तिकिट वाटप आणि उमेदवारांच्या निवडीवरुन ज्योतिरादित्य सिंदिया आणि दिग्विजय सिंह यांनी वाद घातला. उमेदवारांच्या निवडीवरुन दोघांमध्ये मतभिन्नता आहे. पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये तडजोड शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी हा वाद सोडवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. अशोक गेहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल हे काँग्रेसचे तीन ज्येष्ठ नेते वाद सोडवण्यासाठी रात्री अडीज वाजेपर्यंत चर्चा करत होते. पक्षाच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधला हा वाद पाहून राहुल गांधी सुद्धा संतापले असे सूत्रांनी सांगितले.