आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे, अशात लोकसंख्येच्या आधारावर हे आरक्षण दिले गेले पाहिजे अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी केली आहे. लोकसभेत हे विधेयक मांडण्यात सपाने या विधेयकाला विरोध दर्शवला. मात्र त्यानंतर ही चर्चा सुरु आहे. विविध पक्षाचे नेते त्यांची भूमिका मांडत आहेत.

महाराष्ट्रात हे आरक्षण लागू करणे अडचणीचे ठरेल अशी भूमिका खासदार आनंद अडसूळ यांनी घेतली आहे. तर सरकारी नोकऱ्या आणि खासगी नोकऱ्यांमध्येही हे आरक्षण असावं अशी मागणी विविध पक्षांकडून करण्यात येते आहे. याच चर्चे दरम्यान समाजवादीचे नेते धर्मेंद्र यादव यांनी लोकसंख्येच्या आधारे हे आरक्षण दिलं जावं अशी मागणी केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या आरक्षणावर भूमिका मांडत असताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने फक्त जाहीरनाम्यात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. तो त्यांचा चुनावी जुमला होता. सबका साथ सबका विकास ही आमच्या सरकारची भूमिका आहे म्हणून आम्ही हे विधेयक आणले आहे असा टोला जेटली यांनी लगावला.