लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) आघाडीच्या नेतृत्वातही मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. देशातील लोकसंख्येत युवकांची संख्या मोठी असल्याने आणि २०१९ मध्ये होणााऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संघटनेत युवकांना अधिक महत्व दिले जाऊ शकते.

‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार आरएसएसचे विद्यमान सरकार्यवाह सुरेश भैय्याजी जोशी हे मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) बैठकीत पद सोडण्याची घोषणा करू शकतात. त्यामुळे या पदावर नवीन सहकार्यवाहची नियुक्ती होईल. या पदासाठी संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांना या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. ते अनेक वर्षांपासून भैय्याजी जोशी यांच्याबरोबर काम करत आहेत. आरएसएसमध्ये सरकार्यवाह हे पद सरसंघचालकांनंतरचे सर्वांत महत्वाचे पद आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यानंतर भैय्याजी जोशी दुसरे सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगण्यात येते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये यासंबंधी बैठक होण्याची शक्यता आहे.

भैय्याजी जोशी सलग तीनवेळा सरकार्यवाह म्हणून निवडले गेले आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येणार आहे. संघात सरकार्यवाहकाकडे कार्यकारी प्रमुखपद असते. ते दैनंदिन कामकाज पाहतात. संघाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संघटनेत बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. संघात सर्व संमतीने निवडणुका होतात. यावेळीही असेच होईल, आम्ही सर्वांनी आपापसांत यावर चर्चा केली आहे. पण निर्णय एकमतानेच होईल. सरकार्यवाह बदलण्यासाठी तीन नवीन सह-सरकार्यवाहांची नियुक्ती पण अनिवार्य केली जाईल. त्यांची निवड राष्ट्रीय महासचिव करतील. नव्या टीममध्ये युवकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या भैय्याजी जोशींबरोबर तीन सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल आणि होसबळे काम करत आहेत. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भैय्याजी जोशी यांचा नरेंद्र मोदींना खंबीर पाठिंबा होता.

संघातील नेतृत्वामधील बदलांबरोबर त्यांच्याशी निगडीत इतर संघटनांमध्येही परिवर्तनाची आशा आहे. भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि स्वदेशी जागरण मंचाचा संघाशी थेट संबंध आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघात होणाऱ्या बदलावर सर्वांचे लक्ष टिकून आहे.