सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील ‘राजा’ असलेल्या फेसबुकने मोबाइल मेसेजिंगमधील लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपला अखेर गुरुवारी आपल्या बाहुपाशात ओढले. तब्बल ४ अब्ज डॉलर रोख (अंदाजे २५ हजार कोटी रुपये), फेसबुकचे १२ अब्ज डॉलरचे समभाग आणि ३ अब्ज डॉलर किमतीचे नियंत्रित समभाग अशी एकूण १९ अब्ज डॉलर (१ लाख १८ हजार २३७ कोटी रुपये) इतकी किंमत मोजत फेसबुकने ‘व्हॉटसअॅप’ला खरेदी केले. आजवर कोणत्याही कंपनीने दुसऱ्या कंपनीवर ताबा मिळवण्यासाठी मोजलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. पण मोबाइल मेसेजिंगमधील लोकप्रियतेमुळे ‘फेसबुक’लाही जड पडू लागलेल्या व्हॉट्सअॅपला आपल्याकडे खेचण्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जवळपास दोन वर्षे मनधरणी चालवली होती, असेही उघड झाले आहे.
इंटरनेट आणि मोबाइलवरील सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकचे अव्वलस्थान कायम असले तरी अलिकडच्या काळात ‘व्हॉट्सअॅप’ने त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. कोणतेही दूरसंचार सेवाशुल्क न देता ‘व्हॉट्सअॅप’वरून संदेशाची देवाणघेवाण करता येत असल्याने अल्पावधीतच ‘व्हॉट्सअॅप’च्या वापरकर्त्यांची संख्या ४५ कोटींच्या घरात गेली होती. त्यामुळेच फेसबुकने व्हॉट्सअॅपला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालवले होते. त्याची कहाणी अतिशय रंजक आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी २०१२च्या मध्यात व्हॉट्सअॅपचे संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी जेन कोम यांना कॅलिफोर्नियातील लॉस अल्टोस येथील कॉफी शॉपमध्ये भेटण्यास बोलावले. सुमारे तासभर झालेल्या या भेटीत दोघांनी गप्पा मारल्या व नंतर तासभर एकत्र फेरफटकाही मारला. त्याचवर्षी या दोघांनी सहभोजनाच्या निमित्ताने भेटीगाठी केल्या. सिलिकॉन व्हॅलीमध्येही हे दोघे बऱ्याचदा एकत्र दिसल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.
यानंतर यावर्षी ९ फेब्रुवारीला झुकेरबर्ग यांनी कोम यांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले व तेथेच ‘व्हॉट्सअॅप’च्या खरेदीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पाच दिवसांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला, १४ फेब्रुवारी रोजी कोम झुकेरबर्ग यांच्या घरी गेले व तेथेच ‘व्हॉट्सअॅप’ आणि फेसबुकच्या मीलनावर शिक्कामोर्तब झाले, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

करार  काय?
फेसबुकने केलेल्या करारानुसार,
* व्हॉट्सअॅपचे सर्व भांडवली समभाग रद्द केले जातील. त्या मोबदल्यात व्हॉट्सअॅपला ४ अब्ज डॉलर रोख रक्कम आणि फेसबुकचे १२ अब्ज डॉलर किमतीचे १८ कोटी ३८ लाख ६५ हजार ७७८ समभाग दिले जातील.
* याखेरीज व्हॉट्सअॅपच्या कर्मचाऱ्यांमध्ये फेसबुकच्या ४ कोटी ५९ लाख ४४४ नियंत्रित समभागाचे वाटप करण्यात येईल. याचे मूल्य ३ अब्ज डॉलर इतके आहे.
* काही कारणांनी करार न झाल्यास, फेसबुक व्हॉट्सअॅपला एक अब्ज डॉलर रोख रक्कम आणि फेसबुकचे समभाग भरपाई म्हणून देईल.
* व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक कोम यांना फेसबुकच्या संचालक मंडळावर घेतले जाईल.