देशात करोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ६ जुलैपासून सुमारे २ आठवडे कोलकाता विमानतळावरून दिल्ली व मुंबईसह देशातील सहा शहरांसाठी प्रवासी विमान उड्डाणे होणार नसल्याचे कोलकाता विमानतळाने शनिवारी सांगितले.

ज्या शहरांमध्ये कोविड-१९ संसर्गाची प्रकरणे मोठय़ा प्रमाणात आहेत, अशा दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, इंदूर व अहमदाबाद यांसारख्या शहरांसाठी ६ ते १९ जुलै या कालावधीत कुठल्याही विमान उड्डाणांचे नियोजन करू नये, अशी विनंती प. बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला ३० जून रोजी केली  होती. करोना फैलावाशी संबंधित टाळेबंदीमुळे दोन महिने बंद राहिल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक २५ मेपासून सुरू झाली होती. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक मात्र भारतात अद्यापही स्थगित आहे.

‘कोलकात्याहून दिल्ली, पुणे, नागपूर, चेन्नई, इंदूर व अहमदाबाद या शहरांसाठी ६ जुलैपासून १९ जुलैपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत, यांपैकी जे आधी असेल तोवर विमानांचे उड्डाण होणार नाही’, असे ट्वीट कोलकाता विमानतळाने केले.

‘कोविड-१९ च्या फैलावाला आळा घालण्याच्या उद्देशाने हा फैलाव जास्त असलेल्या शहरांमधून येणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार हा तात्पुरता निर्बंध लागू करण्यात आला आहे’, असेही त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये सांगितले.