उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील गोवर्धन परिसरातील एका मशिदीत, चार जणांनी हनुमान चालीसा पठण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या चारही जणांना सामाजिक शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

विशेष म्हणजे कालच मथुरेतील जनपद भागातील नंदगावमधील नंदबाब मंदिराच्या परिसरात दोन जणांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आज मशिदीत नमाज पठण करण्यात आल्याची घटना घडली आहे. तर, मंदिरात नमाज पठण केलेल्यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे.

गोवर्धन येथील रहिवासी असलेल्या सौरभ लंबरदार, राघव मित्तल, कान्हा ठाकूर आणि कृष्णा ठाकूर या चार जणांनी मशिदीत हनुमान चालीसा पठण केले आहे. पोलिसांनी या चौघांनाही अटक केलेली आहे.

दरम्यान, काल मंदिरातील दोन सेवेकऱ्यांच्या तक्रारीवरुन मंदिरात नमाज पठण करणाऱ्या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सेवेकऱ्यांनी नमाज पठण करणाऱ्या तरुणांमागे विदेशी संघटनांचा हात असल्याची शंका व्यक्त केली होती. त्याचबरोबर विदेशी फंडिंगच्या चौकशीची मागणीही केलेली आहे. दिल्लीहून आलेल्या या दोन तरुणांनी या मंदिराच्या परिसरात नमाज पठण केले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.