महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीपासून देशाला प्लास्टिकमुक्त करा, अशी हाक देण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘दिवाळीपूर्वी प्लास्टिकचा कचरा नष्ट करण्याचे मार्ग पालिका, स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांनी सुचवावेत’, असे आवाहन रविवारी केले.

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी गांधी जयंतीपासून प्लास्टिकविरोधी जनचळवळ उभारण्याची हाक दिली. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन केले होते.

गेली काही वर्षे गांधी जयंती निमित्ताने दोन-दोन आठवडे स्वच्छता कार्यक्रम होत आहेत. या वेळी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम ११ सप्टेंबरपासूनच सुरू केला जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आपण यंदा २ ऑक्टोबरला बापूजींची १५०वी जयंती साजरी करू तेव्हा केवळ हागणदारीमुक्त भारतच त्यांना समर्पित करणार नाही, तर प्लास्टिकविरोधात नव्या क्रांतीची मुहूर्तमेढही आपण या दिवशी रोवू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतमातेला प्लास्टिकमुक्त करण्याचा दिवस म्हणून समाजाच्या सर्व घटकांनी गांधी जयंती साजरी करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

नगरपालिका, महापालिका, जिल्हा प्रशासनाने, ग्रामपंचायती, सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांनी प्लास्टिक जमा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. प्लास्टिकचा कचरा नष्ट करण्यासाठी किंवा त्याचा पुनर्वापर वा त्यापासून इंधननिर्मिती करण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे. दिवाळीपूर्वी प्लास्टिक कचरा नष्ट करण्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे आणि त्यासाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा अन्य महान प्रेरणा दुसरी कोणती असू शकते, अशा भावनाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

मॅन व्हर्सेस वाइल्ड

‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चा उल्लेख करताना मोदी म्हणाले, की या कार्यक्रमातील माझ्या सहभागाने भारताचा संदेश, परंपरा, संस्कार, निसर्गाबाबतची संवेदनशीलता या सर्व गोष्टी जगासमोर मांडण्यास मदत होईल. ब्रेयर ग्रिल्सला माझी हिंदी कशी समजली याचे अनेकांना आश्चर्य वाटले, पण ग्रिल्स यांच्या कानाला एक बिनतारी यंत्र लावलेले होते. मी जे बोलत होतो ते त्यांना इंग्रजीत भाषांतरित होऊन ऐकू  येत होते.

तंदुरुस्त भारत

हा नव भारत आहे. आम्ही ठरवलेली उद्दिष्टे जलद गतीने पूर्ण करीत आहोत. २०१९ मध्ये आम्ही वाघांची संख्या दुप्पट केली. भारतात वाघांची संख्याच नव्हे तर त्यांच्यासाठीच्या अधिवास क्षेत्रातही वाढ झाली आहे. भारतात वाघांची संख्या २९६७ आहे. २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ आहे, त्या निमित्ताने देशात ‘तंदुरुस्त भारत अभियान’ सुरू करण्यात येईल, असेही मोदी म्हणाले.