पंजाब, बिहार पाठोपाठ भाजपाला पश्चिम बंगालमध्ये झटका बसला आहे. शिरोमणी अकाली दल, लोजपानंतर पश्चिम बंगालमधील भाजपाचा सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चानं ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून फरार असलेले जीजेएमचे अध्यक्ष बिमल गुरूंग यांनी आज ही घोषणा केली. बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणूक जीजेएम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत लढणार आहे.

मागील तीन वर्षांपासून फरार असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरूंग आज अचानक कोलकातामध्ये दिसून आले. फरार असलेले बिमल गुरूंग हे कोलकातातील सॉल्ट लेक परिसरातील गोरखा भवनाबाहेर दिसले. बाहेरील लोकांना प्रवेश बंदी असलेल्या गोरखा भवनात ते गेले. त्यानंतर बाहेर येत त्यांनी भाजपावर आरोप करत ‘एनडीए’तून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजपाला हा धक्का बसला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना बिमल गुरूंग म्हणाले,”भाजपानं जी आश्वासन दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. पण ममता बॅनर्जी यांनी जी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण केली आहे. त्यामुळे मी एनडीएपासून दूर होऊ इच्छित आहे. मी भाजपाशी असलेले संबंध तोडत आहे,” असं सांगत गुरूंग यांनी भाजपासह एनडीएतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

“२०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत गोरखा जनमुक्ती मोर्चा तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवणार असून, त्यातून भाजपा ठोस प्रत्युत्तर देऊ. मला इतकंच सांगायचं आहे की, गोरखालँडची आमची मागणी अजूनही कायम आहे. आम्ही ही मागणी यापुढेही लावून धरू. हे आमचं ध्येय आहे. आमचं उद्दिष्ट आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ही मागणी स्वीकारणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ,” अशी घोषणाही बिमल गुरूंग यांनी यावेळी केली.

भाजपाला फटका बसणार?

बिमल गुरूंग यांच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा भाजपाला फटका बसू शकतो. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील पहाडी भागात कमीत कमी १० जागांवर भाजपाला फटका बसू शकतो. तिथल्या भाजपाच्या व्होट बँकेवर गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, असं बोललं जात आहे.