‘आयसीएमआर’चे स्पष्टीकरण; धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारची तयारी

देशातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असली तरी, ‘समूह संसर्गा’च्या टप्प्यात भारताचा प्रवेश झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत, असे केंद्रीय आरोग्य खाते तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे. असे असले तरी या टप्प्याचा धोका लक्षात घेऊन राज्याराज्यांत करोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालये, कृत्रिम श्वसनयंत्रांची खरेदी तसेच रेल्वे-सैन्य दलाच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.

खास करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये राखीव ठेवण्याची तातडीची सूचना केंद्राने सर्व राज्यांना केली आहे. त्याचप्रमाणे अशा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयातील खाटा वाढविण्यास सांगितले आहे. त्यानुसार किमान १७ राज्यांनी काम सुरू केले आहे. रुग्णालयांत जास्तीत जास्त खाटा उपलब्ध करण्यासोबतच कृत्रिम श्वसन यंत्रणा, ऑक्सिजन मास्क यांचा पुरेसा साठा करण्याचे आदेशही रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

सैन्य दलाने करोना रुग्णांसाठी आपली २८ रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. याशिवाय सैन्य दलाच्या पाच रुग्णालयांत रुग्णांच्या चाचण्या करण्याची सुविधा आहे. करोनाबाधितांसाठी वैद्यकीय आणि विलगीकरण कक्ष उभारण्याकरिता साधनसामग्रीची खरेदी करता यावी म्हणून सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी खर्च करण्याचे अधिकार शुक्रवारी सरकारने दिले.

संरक्षण सामग्री क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक लि. कंपनीवर व्हेंटिलेटर निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणात्मक साधने, मास्क, सॅनिटायझर निर्मितीचे काम ‘डीआरडीओ’ने सुरू केले आहे.

रेल्वेच्या डब्यांत विलगीकरण कक्ष

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सज्जता असावी यासाठी रेल्वेने बिगरवातानुकूलित डब्यांचे रूपांतर विलगीकरण कक्षात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याबाबतचा प्रयोग सुरू असून तो यशस्वी झाल्यानंतर दर आठवडय़ाला रेल्वेच्या दहा डब्यांचे रूपांतर विलगीकरण कक्षात करण्यात येईल, अशी माहिती उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिली. या डब्यांतील मधली आसने हटवून खालच्या बाजूस प्लायवूड टाकून खाटा तयार करण्यात येणार आहेत. एका डब्यात विलगीकरण कक्ष असतील व त्यांना आवश्यक ती वीजजोडणी यंत्रणाही पुरवण्यात येणार आहे. याखेरीज या डब्यांमध्ये स्नानगृहे, औषध दुकाने, वैद्यकीय तपासणी कक्ष अशा सुविधाही निर्माण करण्यात येतील.